आरोग्य – शरीर उत्तम राखणारा मज्जा धातू
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
संपूर्ण शरीरात मज्जावह स्रोतांद्वारे फिरणारा मज्जा धातू, ज्याचे मूळ अस्थी आणि सांधे असतात. अस्थी धातूद्वारे पोषण होणाऱ्या या धातूंचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी वात दोषाला ताब्यात ठेवणे आवश्यक ठरते.
पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते, `इंग्रजीत ज्याला नर्वस सिस्टीम म्हणतात त्याला मराठीत मज्जा म्हणतात.’ किती मजेदार गोष्ट आहे नाही? हाच मज्जा धातू संपूर्ण शरीरात असतो आणि मज्जावह स्रोतांद्वारे फिरत असतो. याचे मूळ अस्थि आणि सांधे आहेत आणि पोषण अस्थी धातू नंतर होते. अस्थी आणि मज्जा याना विकृत करणारा वात दोष आहे म्हणून या धातूंचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी वात दोषाला ताब्यात ठेवणे आवश्यक आहे.
वात आणि त्याच्याबरोबर असलेले त्रिदोष बिघडल्यास मज्जा धातूचा क्षय होतो आणि त्याचा सर्वाधिक वाईट परिणाम अस्थि धातूवर होतो. यामुळे हाडे कमकुवत होणे, हलकी होणे, वेदना, भोवळ, दृष्टीदोष इत्यादी समस्या निर्माण होतात. आधुनिक विज्ञानानुसार हे ऑस्टिओपोरोसिस, व्हर्टिगो इत्यादींशी संबंधित आहे. आयुर्वेदानुसार अस्थि-मज्जा विकारांचे लवकर निदान आणि निराकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
मज्जा धातू आवश्यकतेपेक्षा अधिक वाढला तर अंग जड वाटणे, डोळ्यांत जडपणा, बोटांची जाडी वाढणे अशी लक्षणे दिसू लागतात असे काही ग्रंथकारांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे मज्जा क्षयाची लक्षणे हाडे पोकळ होणे (ऑस्टिओपोरोसिस), भोवळ येणे, दृष्टी धूसर होणे अशी दिसून येतात
मज्जासार म्हणजे मज्जा धातू उत्तम असणाऱ्या व्यक्तीची वैशिष्टय़े भुवया व पापण्या काळ्या आणि मऊ, त्वचा मऊ, पातळ आणि चमकदार, केस मऊ, तेलकट आणि गडद काळे, तोंड, ओठ, जिभा तेलकट, बुद्धिमान व ज्ञानसंपन्न,दीर्घ, निरोगी आणि आनंदी जीवन अशी असतात.
मज्जा धातू उत्तम राहण्यासाठी शरीर आणि मन स्थिर ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे शरीराचे संपूर्ण पोषण होणे आवश्यक आहे. साजूक तूप, गोड आणि कडू चव असलेला पौष्टिक आहार घ्यावा. नियमित अभ्यंग (तेल मालिश), चांगली झोप आणि संतुलित दिनचर्या आवश्यक आहे. आपले शरीर काय संकेत देत आहे त्याकडे लक्ष ठेवा आवाज खोल जाणे,सांध्यांची कुरकुर वाढणे आणि मनाची अस्वस्थता किंवा सतत विचारात गोंधळ हे महत्त्वाचे निर्देशक आहेत.
मज्जा धातू योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आहारात तूप, तीळ तेल, भिजवलेले बदाम, अक्रोड, तीळ, गरम दूध घ्यावे. मांसाहारी अन्न घेणाऱ्यांनी हाडाचे सूप उदा पाया सूप घ्यावे. कॅफिन, साखर, जास्त मसालेदार पदार्थ टाळावे.
आवश्यक नसताना प्रचंड प्रमाणात वापरली जाणारी कीटक नाशके ही बऱ्याचदा मज्जासंस्थेवर दुष्परिणाम करणारी असतात त्यांचा वापर नियंत्रणाखाली आणले पाहिजे. सध्या कोणीही अशिक्षित शेतकरी दुकानातून ही घातक रसायने विकत घेऊ शकतो. त्यांना डॉक्टरप्रमाणे मान्यताप्राप्त कृषी पदवीधारकाचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य केले पाहिजे.
दिनचर्येत अभ्यंग (तेल मालिश), पुरेशी झोप, सौम्य व्यायाम, योग व ध्यान यांचा समावेश करावा. आयुर्वेदानुसार नस्य (नाकाद्वारे तेल), बस्ती अश्वगंधा, बला, यष्टिमधु या औषधांचा वैद्यांचा सल्ल्याने वापर करणे योग्य ठरेल. तसेच उत्तम प्रतीचा च्यवनप्राश खाणे हिताचे ठरेल. सध्या बाजारात भेसळीमुळे अनेक च्यवनप्राश नुसते शरीरात साखरेचे प्रमाण वाढवतात. त्याकरिता खात्री करून मगच च्यवनप्राश घ्यावा.
Comments are closed.