आरोग्य – मेद धातूचे परिणाम
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
मेद धातू म्हणजे मांस धातू पूर्णपणे पचल्यावर तयार होणारा धातू. स्थूलता म्हणजे मेद धातूचे असामान्य व अधिक प्रमाणात साठणे होय. आयुर्वेदात या रोगाविषयी सखोल विचार मांडले आहेत.
आज सर्व जगाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे स्थौल्य म्हणजेच जाडेपण. त्यावर उपाय सांगणारे आणि औषधविक्री करणारे अब्जाधीश झाले आहेत. कुठल्याही दुष्परिणामांचा विचार न करता सकाळ- संध्याकाळ जेवणाऐवजी वेगवेगळ्या पावडरी पाण्यात मिसळून वजन पटकन कमी करण्याचे उपाय केले जातायत. जाहिरात करून आणि एजंटद्वारे विकलेली औषधे पैसा आणि शरीराचे आरोग्य यावर दूरगामी परिणाम करणारी आहेत हे फार उशिरा लक्षात येते. त्यातून सुटका होण्यासाठी या लेखाचा जरा जरी फायदा झाला तर बरं.
मेद धातू म्हणजे मांस धातू पूर्णपणे पचल्यावर तयार होणारा धातू. स्थूलता म्हणजे मेद धातूचे असामान्य व अधिक प्रमाणात साठणे होय. आयुर्वेदात या रोगाविषयी सखोल विचार मांडले आहेत.
स्थूल व्यक्तींमध्ये मेद धातूचा अतिरेक होऊन इतर धातूंना योग्य पोषण मिळत नाही. जेव्हा कफदोष असामान्यपणे वाढतो, तेव्हा चरबीचे चयापचय बिघडते आणि व्यक्ती स्थूल होते. आचार्य चरक आणि सुश्रुत यांनी स्थूलतेला गंभीर आरोग्य समस्या मानले आहे. आचार्य चरक यांनी तर अशा व्यक्तीना अष्टनिंदित पुरुषांमध्ये गणले आहे.
मेद धातूचे गुण : मेद धातू स्निग्ध, स्थिर, गुरू, सांद्र आणि मृदू असतो. त्याचे गुण कफदोषासारखेच आहेत. कारण दोन्ही जल व पृथ्वी महाभूतप्रधान आहेत.
मेद धातूचे कार्य- स्नेहन, स्वेदन, शरीराला दृढता आणणे, स्निग्धत्व, अस्थी पोषण, नेत्रांची स्निग्धता, शरीराच्या अवयवांची स्निग्धता, शरीरपोषण ही मेद धातूची महत्त्वाची कामे आहेत.
मेदवह स्रोतसचे मूळ :
चरक, सुश्रुत आणि वाग्भटनुसार वृक्क म्हणजे किडनी आणि कंबर ही मेदाची स्रोत आहेत.
उपधातू : स्नायू आणि सांधे हे मेद धातूचे उपधातू आहेत.
मेदवृद्धी : आचार्य सुश्रुत यांच्या मते मेद वाढल्यास शरीरात स्निग्धता वाढते, पोट व कमरेभोवती चरबी वाढते. खोकला, श्वास लागणे आणि दुर्गंधी निर्माण होते. आचार्य वाग्भट यांच्या मते मेदवृद्धीमुळे थकवा, थोडे काम केल्यावरही श्वास वाढणे, नितंब, स्तन व उदर लोंबणे अशी लक्षणे दिसतात.
मेद धातू (शरीरातील चरबी) कमी करण्यासाठी आयुर्वेदानुसार हलका, पचायला सोपा, कफ कमी करणारा आणि अग्नी वाढवणारा आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मेद धातू कमी करण्यासाठी आहार –
धान्ये : ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदळाऐवजी मर्यादित प्रमाणात लाल तांदूळ किंवा उकडा तांदूळ, गहू टाळणे चांगले अथवा कमी प्रमाणात खावा.
कडधान्ये : सर्वात उत्तम मूगडाळ आहे. त्याचबरोबर मसूर डाळ, चणे (भाजलेले चणे), मर्यादित प्रमाणात तूरडाळ खावी.
भाज्या : वेल वर्गातल्या सर्व भाज्या उपयुक्त आहेत. उदा. कारले, दोडका, घोसाळे तसेच पालक, मेथी, शेपू खाव्यात. बटाटा, रताळे, अरबी, अळकुडीसारख्या जास्त स्टार्चयुक्त भाज्या खाण्यापेक्षा गाजर, बीट, कोबी, फुलकोबी या भाज्या खाव्यात.
फळे – सफरचंद, पेरू, डाळिंब, पपई इत्यादी फळे उपयुक्त आहेत, परंतु केळी, आंबा, चिकू (गोड व कफवर्धक) फळे खाऊ नयेत.
अग्निवृद्धीसाठी आले, हळद, काळी मिरी, जिरे, त्रिकटू (सुंठ, मिरी, पिंपळी) या मसाल्यांचा वापर जेवणात आवश्य करावा.
मेदवृद्धी होऊ नये म्हणून तळलेले पदार्थ (भजी, वडे), गोड पदार्थ (मिठाई, साखर), जंक फूड, थंड पेये, आईक्रीम, जास्त तेलकट आणि स्निग्ध पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ (जास्त प्रमाणात) टाळावे. वेळेवर जेवण करा, अति खाणे टाळा, रात्री हलके जेवण घ्या , जेवणानंतर थोडे चालणे, दिवसात किमान 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.
मेद धातू कमी करण्यासाठी आहार, व्यायाम, योग्य दिनचर्या हे तिन्ही आवश्यक आहेत. आहार बदलून परिणाम मिळत नाही.
मेदक्षय : मेदक्षय झाल्यास सांध्यात कटकट होणे, डोळ्यांत थकवा, अशक्तपणा आणि पोट कृश होणे दिसते. मेद कमी झाल्यास प्लीहा वाढणे, सांध्यात पोकळपणा जाणवणे, कोरडेपणा आणि स्निग्ध आहाराची इच्छा निर्माण होते.
असे रुग्ण शहरी भागात आढळण्याचे प्रमाण कमी असले तरी ग्रामीण भागात रुक्ष अन्न, प्रचंड अंग मेहनत, दूधदुभत्याचा अभाव असल्याने प्रमाण खूप आहे. त्यासाठी दूध, तूप, तेल, मांसाहार, उडीद, शेंगदाणे, गोड पदार्थ आणि स्नेहन, स्वेदनसारखी पंचकर्मे करून मेदक्षय कमी करता येईल.
Comments are closed.