क्रीडानगरीतून – आयुष शेट्टीचा सनसनाटी विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचा युवा शटलर आयुष शेट्टीने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या ली शी फेंगचा पराभव करत बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत दमदार सुरुवात केली. निंगबो येथे झालेल्या या सामन्यात आयुषने सरळ गेममध्ये 21-13, 21-16 असा विजय मिळवला. 51 मिनिटे चाललेल्या या सामन्यात हिंदुस्थानी खेळाडू पूर्णपणे वर्चस्व राखताना दिसला. आयुष आणि ली शी फेंग यांच्यातील ही पहिलीच लढत होती. अनुभवात कमी असूनही आयुषने कोणताही दबाव न घेता आक्रमक खेळ केला. 2023च्या ऑल इंग्लंड ओपन विजेत्या फेंगविरुद्धच्या या विजयामुळे आयुषने स्वतःला उदयोन्मुख स्टार म्हणून सिद्ध केले.

जैन इरिगेशन अंतिम फेरीत

मुंबई – ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स ‘अ’ संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत जैन इरिगेशन ‘ब’ संघाने 19व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आरसीएफ कॉर्पोरेट टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या लढती खेळपट्टी ओली असल्यामुळे 15 षटकांच्या खेळवण्यात आल्या. त्यात जैन इरिगेशन ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑटोमोटिव्ह सीसी संघाला 15 षटकांत 112 धावांवर रोखले. जैन इरिगेशन संघाचा डावही 15 षटकांत 112 धावांवर आटोपल्याने सामना बरोबरीत (टाय) सुटला. सुपर ओव्हरमध्ये जैन इरिगेशनने एका विकेटच्या बदल्यात 8 धावा केल्या. त्यानंतर ऑटोमॅटिक सीसी संघाला 1 बाद 4 धावांवर रोखले.

प्रशांत-ऐशाकडे मुंबई संघाचे नेतृत्व

नवी मुंबई – नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने व महाराष्ट्र पॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट पॅरम असोसिएशनच्या मान्यतेने 13 ते 16 एप्रिल 2026 दरम्यान वाशी येथे  होणाऱया 60 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. मुंबईचा माजी विश्वविजेता प्रशांत मोरे व मुंबईची आंतरराष्ट्रीय पॅरमपटू ऐशा खान मुंबईच्या संघाचे नेतृत्व करणार आहेत.

Comments are closed.