केवळ 20 धावा अन् ‘टुक-टुक’ बाबर होईल सर्वात वेगवान, क्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मधील पहिला सुपर-८चा सामना आज (२१ फेब्रुवारी) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा पाकिस्तानच्या बाबर आझमवर असणार आहेत. तो या सामन्यात दिग्गज क्रिस गेलचा एक विश्वविक्रम तोडू शकतो.

बाबर काही दिवसांपासून टी२० क्रिकेटमधील सर्वात वाईट स्ट्राईक रेटमुळे चर्चेत आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मात्र त्याला याच प्रकारामध्ये १२००० धावा करण्याचा विश्वविक्रम नावावर करण्याची संधी आहे. यासाठी त्याला केवळ २० धावांची आवश्यकता आहे.

टी२० क्रिकेटमध्ये बाबरने आतापर्यंत ३४६ सामने खेळले आहेत. त्यामधील ३३४ डावांमध्ये ११८८० धावा केल्या आहेत. दुसरीकडे गेलने १२००० टी२० धावा केल्या आहेत. या धावा त्याने ३४२ डावांमध्ये केल्या होत्या. त्यामुळे बाबरला त्याच्या पुढील सामन्यात २० धावा करताच तो ३३५ डावांमध्ये १२००० धावांचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरेल. जो एक विश्वविक्रमच असेल.

त्याचबरोबर बाबर टी२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा करणारा केवळ दुसराच पाकिस्तानी खेळाडू ठरणार आहे. पाकिस्तानकडून शोएब मलिकने १२ हजार धावा केल्या आहेत, मात्र त्यासाठी त्याने ४५१ डाव खेळले होते. भारताच्या विराट कोहलीने ३६० डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

बाबरकडे पाकिस्तासाठी टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचीही संधी आहे. त्याने आतापर्यंत २० डावात ६१५ धावा केल्या आहेत. या यादीत मलिक पहिल्या स्थानावर असून त्याने ३१ डावांमध्ये ६४६ धावा केल्या आहेत. यावरून बाबरने ३२ धावा करताच तो पहिल्या स्थानी येईल.

या स्पर्धेत बाबरने चांगली कामगिरी केली नाही. त्याने ३ सामन्यात खेळताना केवळ ६६ धावाच काढल्या. तसेच नामिबियाविरुद्ध तो फलंदाजीला आलाच नाही.

Comments are closed.