बच्चू कडूंच्या आंदोलन चिघळलं; आंदोलकांनी टायर पेटवुन समृद्धी महामार्ग रोखला, वाहनांच्या लांबच लांब रांगा
नागपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. अशातच या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत.

‘भलेही तुम्ही कर्जमाफी नंतर करा पण त्याचा जीआर तरी आज काढा’, अशी आग्रही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. गेल्या वीस तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागपूरच्या महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव, उसाची एफआरपी, दुधाचे दर आणि सातबारा कोरा करणे यासह शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ आणि दिव्यांगांच्या एकूण २२ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे दोन प्रतिनिधी आंदोलकांशी चर्चा करणार असून, या चर्चेतून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाले असून टायर पेटवुन रोड रोखले आहे. गेल्या दोन तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर-मुबंई समृद्धी महामार्ग रोखलाय.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने याची अद्याप दखल घेतली नाही. आज संतापलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर दोन तासांपासून वाहनांची वाहतूक पूर्णपणे रोखली आहे.

हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा निर्णायक लढा असल्याचे सांगत, स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला इशारा दिला आहे. “सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि सरसकट कर्जमाफीवर ठोस भूमिका घेतली नाही, तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक घडवून आणू. असा इशारा सरकारला दिला आहे.

या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिस प्रशासन सतर्क आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे होणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

तर आज 4 वाजताच्या सुमारास राज्याचे गृहराज्य मंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडूंशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आता गृहराज्यमंत्री आणि अर्थ राज्यमंत्र्याच्या शिष्ठाईला यश येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
येथे प्रकाशित : 29 ऑक्टोबर 2025 03:03 PM (IST)
Comments are closed.