Bacchu Kadu statement on farmers also criticized on congress bjp in marathi
अमरावती : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती. यावेळी झालेल्या पराभवाबद्दल माजी आमदार बच्चू कडू यांनी आपली खदखद बोलून दाखवली. “बच्चू कडूंनी लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आले असते, पण मी शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार आहे. पुन्हा एकदा निवडणुकीत पडलो तरीही मला फिकीर नाही,” असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि भाजपवरही टीका केली. ते अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंती निमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते. (Bacchu Kadu statement on farmers also criticized on congress bjp)
माजी आमदार बच्चू कडू म्हणाले की, “मी शेतकरी आहे म्हणून बोलतो आहे, कोणालाही त्याचा राग आला तरी चालेल. पण बच्चू कडू त्याची पर्वा करत नाही. मी कधीही लाचारी स्विकारली नाही, तसं केले असते तर कोणाचा पाठिंबा घेऊन मला आमदार होता आले असते. पण ती लाचारी आमच्यात नाही.” असे ते म्हणाले. “छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामधील वतनदारी बंद केली. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असे म्हणणारे राजे आता कोणत्याच पक्षात दिसत नाही. 50 टक्के नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असे भाजपने म्हटले होते. काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू म्हटले होते. पण, काँग्रेसने सुद्धा लागू केला नाही. पक्ष कोणताही असला तरी तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, हे आपण 75 वर्षात पाहिले आहे”, असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधला.
अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंती निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा मांडला. दरम्यान, आधी महायुतीसोबत राहिलेल्या बच्चू कडू यांनी 2024च्या निवडणुकीत महायुतीची साथ सोडत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी स्वतः बच्चू कडू हे अचलपूर विधानसभेत उभे राहिले आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केला.
Comments are closed.