विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केले होते. आधी कर्जबाजारी होतात, नंतर कर्जमाफी मागतात, असे विखे-पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून आता ‘प्रहार’ संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विखे-पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
नाव राधाकृष्ण आहे, मात्र कृत्य कंसाचे करायची असतील तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलू लावली पाहिजे, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तर दुसरीकडे वाचाळवीर मंत्री अशी विधाने करतात. लोक मारत नाही याचे आभार माना आणि ही नायालकी थांबवा, असेही बच्चू कडू म्हणाले. यावेळी त्यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्या एक लाख बक्षी देण्याची घोषणा केली. तसेच मला जर त्यांची गाडी दिसली तर मीच फोडणार, असेही ते म्हणाले.
आधी कर्जबाजारी होतात, नंतर कर्जमाफी मागतात, शेतकऱ्यांबाबत विखे पाटलांचे वक्तव्य
काय म्हणाले विखे-पाटील?
कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ अशा संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिवचणारे वक्तव्य केले. पंढरपूर येथे एका सभेत भाषणादरम्यान विखे पाटील यांची जीभ घसरली. ते म्हणाले, सोसायटी काढायची, कर्ज काढायचे, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. याची चिंता नाही. महायुती सरकार 100 टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
Comments are closed.