हॉल्ट असूनही लोको पायलट विक्रोळीत गाडी थांबवायला विसरला, प्रवाशांचा संताप
बदलापूरकडे जाणारी जलद लोकल (BD-37) गुरुवारी सायंकाळी सुमारे 5:52 वाजता विक्रोळी स्थानक येथे नियोजित थांबा असतानाही न थांबता पुढे गेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे प्लॅटफॉर्मवरील तसेच ट्रेनमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली असून रेल्वे सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लोकल डाउन फास्ट मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर थांबण्याऐवजी सुमारे चार डब्यांच्या अंतराने पुढे गेली. प्रवाशांनी ट्रेन थांबावी म्हणून हातवारे करत लोको पायलटचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रेन वेगातच पुढे जात राहिली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच गार्डने तातडीने इमर्जन्सी ब्रेक लावले आणि स्थानक ओलांडल्यानंतर काही अंतरावर ट्रेन थांबवण्यात आली.
या घटनेनंतर संबंधित लोकलला भांडुप स्थानक येथे सायंकाळी 5:52 ते 6:00 या कालावधीत थांबवण्यात आले. या दरम्यान रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील हालचालींबाबत निर्णय घेतला. काही प्रवाशांनी या प्रकारामुळे मोठी भीती निर्माण झाल्याचे सांगितले, तर काहींनी रेल्वेच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली.
मध्य रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, विक्रोळी स्थानकावरील नियोजित थांबा का चुकला याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. प्राथमिक तपासात मानवी चूक की तांत्रिक बिघाड, याचा शोध घेतला जात आहे.
Comments are closed.