बद्रीनाथ यात्रा तात्पुरती स्थगित.

बद्रीनाथ-केदारनाथ मार्गावर दरड कोसळली : अनेक वाहने अडकली

वृत्तसंस्था/चमोली

उत्तराखंडमध्ये मान्सूनोत्तर मुसळधार पाऊस कोसळत असतानाच गुरुवारी रुद्रप्रयाग आणि चमोलीसह अनेक जिह्यांमध्ये भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले. बद्रीनाथ आणि केदारनाथ महामार्गांवर दरड कोसळल्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उत्तराखंडमध्ये डोंगरांना पडलेल्या अनेक भेगांमुळे केदारनाथ यात्रेचा मार्ग बंद झाला आहे. पावसाला सुरुवात झाल्याने गुलाब कोटीजवळ रस्त्यावर दगड कोसळल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद केल्यामुळे बद्रीनाथ यात्रा थांबली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

तसेच उत्तराखंडमधील बागेश्वर येथे एक झाड कोसळल्याने पुडकुनी-चालकाना रस्ता बंद झाला आहे. एसडीआरएफचे एक पथक केदारनाथ यात्रेकरूंना सुरक्षितपणे मार्ग ओलांडण्यास मदत करत आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत आहेत. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या, यात्रेकरूंची वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकली आहेत. पर्वतीय प्रदेशात मान्सूनच्या आगमनाने मुसळधार पाऊस सुरू झाला असून, गेल्या 24 तासांपासून बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत झाला आहे. गुलाब कोटीजवळ ढिगारा पडल्याने गुरुवार सकाळपासून पूर्णपणे रस्ता बंद आहे. हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी बांधकाम विभाग आणि आपत्कालीन यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरू होते.

Comments are closed.