मूसेवाला प्रकरणात दोघांना जामीन मंजूर

पवन बिश्नोई, जगतार सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी पवन बिश्नोई आणि जगतार सिंग यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पवन बिश्नोई आणि जगतार सिंग या दोन आरोपींना जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दोन्ही आरोपींना दिलासा दिला. दोघांवरही 2022 मध्ये सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येशी संबंधित कट रचल्याचा आणि संबंधित बाबींचा आरोप होता. पवन बिश्नोई आणि जगतार सिंग यांच्यावर हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्यांना बोलेरो गाडी पुरवल्याचा आरोप होता. आरोपपत्रात त्यांचा संबंध बिश्नोई टोळी आणि गोल्डी ब्रारशी जोडला गेला होता. आरोपी पवन बिश्नोई आणि जगतार सिंग यांनी 2023 मध्ये मानसा येथील स्थानिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने जामीन नाकारला होता. पवन बिश्नोईने न्यायालयासमोर आपला खटला सादर करताना स्वत: निर्दोष असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी मात्र त्याचा हा दावा खोडून काढला आहे.

Comments are closed.