गुंडय़ाभाऊ गेले! बाळ कर्वे यांचे निधन, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गुंड्याभाऊ म्हणून घराघरात पोचलेले तसेच अनेक दशके आपल्या सहजसुंदर अभिनय, दिलखुलास स्वभावाने सर्वांना जिंकून घेणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. बाळ कर्वे यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा माध्यमांत छाप सोडली होती. अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा केदार कर्वे, मुलगी प्रा. स्वाती वाघ, जावई मिलिंद वाघ, सून, नातवंड असा परिवार आहे.  बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण.’ ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे’ येथून ते ‘स्थापत्य अभियंता’ झाले. त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीला लागले. त्यांनी 32 वर्षे नोकरी केली. ‘किलबिल बालरंगमंच’ अशी छोटीशी संस्था स्थापन करून बालनाटय़ंही केली.   बाळ कर्वे यांनी विजया मेहता आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नाटय़ प्रवासाची सुरुवात केली. लालन सारंग यांच्याबरोबर ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, भक्ती बर्वेंबरोबर ‘मनोमनी’, ‘आई रिटायर होते’, डॉ. गिरीश ओकांबरोबर ‘कुसुम मनोहर लेले’ अशी नाटके केली. बन्याबापू’, ‘लपंडाव’, ‘गोडी गुलाबी’, ‘चटक चांदणी’ या चित्रपटांत त्यांनी काम केले.

गुंड्याभाऊ अजरामर केला

गुंड्याभाऊ हे बाळ कर्वेंनी साकारलेलं पात्र विशेष गाजले. चिं. वि. जोशी यांच्या कथेवर ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ मालिका 1979 मध्ये प्रसारित झाली होती. मालिकेत चिमणराव म्हणजे दिलीप प्रभावळकर आणि गुंड्याभाऊ म्हणजे बाळ कर्वे अशी जोडी होती. गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे नाव विचारात होते, पण काही कारणाने ही भूमिका बाळ कर्वे यांना मिळाली. त्यांनी ती भूमिका अजरामर केली.  गुंड्याभाऊ या पात्राने मिळवून दिलेली ओळख इतकी आहे की, आजही विलेपार्ल्यातून फिरताना लोक गुंड्याभाऊ म्हणूनच मला ओळखतात, असे कर्वे एका मुलाखतीत म्हणाले होते.

वयाने  मोठे असूनही आमच्याशी त्यांचे छान जमायचे. ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाचे आम्ही 700 च्या वर प्रयोग केले. नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आम्ही एकत्र असायचो. कर्वे यांचा सहवास आम्हाला लाभला. ते सिव्हिल इंजिनीयर असल्याने व महानगरपालिकेत नोकरी करत असल्याने त्यांना मुंबईची खूप माहिती होती.

गिरीश ओक, अभिनेता

त्यांनी अत्यंत निवडक पण चांगली नाटकं केली. त्यांनी केलेले प्रत्येक नाटक गाजले. एकदम दिलखुलास, मोकळा हात असलेले व्यक्तिमत्त्व. त्यांच्यासोबतच्या दीर्घ दौऱ्यात त्यांचे शिस्तबद्ध वागणं जवळून अनुभवलंय. कोणती वस्तू कुठे ठेवलीय याची त्यांना अचूक माहिती असायची. कुठेही गडबड नाही.

संजय मोने, अभिनेता

Comments are closed.