रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 23 हजार बोगस मतदार!शिवसेनेचा ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’

देशात मतदान चोरीचा विषय गाजत असतानाच शिवसेना उपनेते बाळ माने यांनी रत्नागिरीत ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ फोडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला दणका दिला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तब्बल 23 हजार बोगस मतदार असल्याचा आरोप आज त्यांनी केला. ही बोगस नावे रद्द करत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या वेळी बोगस मतदार यादी असलेले माहिती त्यांनी पेन ड्राईव्हद्वारे पत्रकारांना उपलब्ध करून दिली.

माने म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळीच आम्हाला ही माहिती मिळाली होती. आम्ही निवडणूक अधिकाऱयांकडे आणि निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार करताना बोगस मतदार यादी दिली होती. त्यामध्ये दुबार मतदार नावांचा समावेश होता. मात्र निवडणूक निरीक्षकांनी आमची बाजू ऐकूनच घेतली नाही, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, रशिदा गोदड उपस्थित होत्या.

‘उमेद’च्या अधिकाऱयांचा निवडणुकीत गैरवापर

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’च्या अधिकाऱयांचा निवडणुकीच्या काळात वापर करून बचत गटांना आमिष दाखविण्याचे काम केले. रत्नागिरीतही एक अधिकारी उदय सामंत यांच्या प्रचाराचे काम करत होत्या असा खळबळजनक आरोप माने यांनी केला. निवडणुकीपूर्वी सर्व्हेमध्ये उदय सामंत यांचा पराभव होणार असा अहवाल असताना अचानक त्यात बदल कसा झाला? काही बोगस मतदारांचा त्यांनी आधार घेतल्याचा संशय माने यांनी व्यक्त केला. हा धोका आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्भवू शकतो.

Comments are closed.