मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत, बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळ याबाबत निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मोर्चात सहभागी सर्वपक्षीय कार्यकार्त्यांना संबोधित केले. यावेळी मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे अशी जोरदार मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

आपल्या देशाची लोकशाही, राज्यघटना वाचवण्यासाठी आजचा लाखोंचा जनसमुदाय, सत्याचा मोर्चा येथे आलेला आहे. आजचा मोर्चा हा अभूतपूर्व आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाला चालवणाऱ्या सत्तांविरोधात हा मोर्चा आहे, असे थोरात म्हणाले.

राहुल गांधी यांनी दाखवून दिलं की देशाच्या निवडणुका मतचोरीतून होतायत. राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय आयोगाने थातूरमातूर उत्तर दिलं. केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर देशातील सर्वात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल. त्यांनी खुलासा, चौकशी केली नाही. त्यावेळी असं लक्षात आलं की महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अशाच पद्धतीने बोगस पद्धतीने बोगस मतदार यादीवर झालेल्या आहेत.

विधानसभेच्या मतदार यादीवर कोणत्याही हरकतीवर निर्णय न घेता त्यांनी 1 जुलै रोजी ती राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो आणि विधानसभेच्या वेळी वापरलेली मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांना वापरू नका असं त्यांना सांगितलं. आम्ही सर्वजण दोन्ही निवडणूक आयोगाला भेटलो. केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो पण ते उत्तर देऊ शकले नाही. राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो ते उत्तर देऊ शकले नाही, असे बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले.

मतदार याद्यांमधील कसा घोळ सुरू आहे याची अनेक उदाहरणं सांगितली. माझ्या संगमनेरच्या मतदारसंघातील ग्रामीण भागातील साडेनऊ हजार मतदार यादी बोगस आहे. यावर आम्ही हरकत घेत हे दुरुस्त झालं पाहिजे असं सांगितलं. मात्र तहसिलदारनं आम्हाला दुरुस्ती करण्याचा कोणताही अधिकार नाही, असं लेखी उत्तर दिलं. याचा अर्थ विधानसभेला जी मतदार यादी होती ती कोणत्याही दुरुस्तीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरली जाणार आहे.

ही बोगस मतदार यादी ही दुरुस्त झाली पाहिजे, त्याकरीता हा मोर्चा आहे. माागच्या विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. बोगस मतं नोंदवण्यात आलेल्या आहेत. ते तसेच ठेवून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत, त्यानंतर निवडणूक घेतली जावी याकरीता आपण सर्वजण आग्रही असल्याचे असे बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितले.

Comments are closed.