IPL 2026 – तो पूर्णपणे फिट आहे, चिंता करू नका! अय्यरच्या दुखापतीवर चहलचे मलम
श्रेयस अय्यरच्या हाताला लागलेल्या चेंडूने पंजाबच्या संघातील खेळाडूंच्या काळजात धस्स झाले होते. धडधड वाढवली होती, पण तो पूर्णपणे फिट आहे, चिंता करू नका, अशा युझवेंद्र चहलच्या वाक्याने पंजाब किंग्सच्या बाकावर पसरलेली चिंता क्षणात नाहीशी केली.
गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना नॉन-स्ट्रायकर टोकावर उभ्या अय्यरच्या मनगटावर चेंडू जोरात आदळला. तत्काळ वैद्यकीय सहाय्यक मैदानात धावून आला. दुखापत होऊनही अय्यरने जिद्दीने खेळ सुरू ठेवला, मात्र 11 चेंडूंत 18 धावा (2 षटकारांसह) करून तो बाद झाला.
सामन्यानंतर अय्यरने सावध प्रतिक्रिया देत ‘सगळं पूर्वीसारखंच आहे’ असं सांगितलं. पण खरी खात्री दिली ती चहलने. अय्यर पूर्णपणे ठणठणीत असल्याचं विश्वासाने सांगितल्यामुळे सर्वांचे चेहरे चिंतामुक्त दिसत होते.
दरम्यान, पंजाबच्या विजयाचा खरा नायक ठरला युवा कूपर कॉनली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 44 चेंडूंत 72 धावांची झंझावाती खेळी करत ‘सामनावीर’ किताब पटकावला. 5 चौकार आणि 5 षटकारांनी सजलेल्या या खेळीच्या जोरावर पंजाबने 163 धावांचे लक्ष्य पाच चेंडू राखून गाठले. चहलने कॉनलीचे काwतुक करत म्हटलं की, वय कमी असलं तरी परिस्थितीची जाण अफाट आहे. शेवटपर्यंत टिकून सामना संपवण्याची त्याची वृत्ती संघासाठी मोठी जमेची बाजू आहे.
Comments are closed.