ईव्हीएम हटावसाठी उपोषणाला बसलेल्या बाळराजे आवारे यांची प्रकृती बिघडली, उपोषणाचा सहावा दिवस, उपचार नाकारले; संजय राऊत यांच्याकडून विचारपूस

जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांची प्रकृती बिघडली असून, त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता. दुसरीकडे प्रशासनाने उपोषण बेदखल केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

ईव्हीएमच्या विरोधात कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी 16 जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता. अन्नत्यागामुळे बाळराजे आवारे यांची प्रकृती ढासळली असून, त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यांनी वैद्यकीय उपचारही नाकारले आहेत. जिल्हा प्रशासनाने उपोषणाची अद्यापही दखल घेतली नाही. प्रशासनाने उपोषण वाऱ्यावर सोडल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सोलापूर-धुळे महामार्गावर चोराखळी, अंदोरा, येरमाळा येथे रस्त्यावर टायर जाळले.

ईव्हीएमचा आग्रह का?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेक देशांमध्ये ईव्हीएम हद्दपार करण्यात आले असून, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात येत आहेत, मग आपल्याकडेच ईव्हीएमचा आग्रह का? असा सवालही थोरात यांनी केला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब शेळके, तांदुळवाडीचे सरपंच अॅड. प्रणित डिकले आदी होते.

प्रशासनाशी चर्चा निष्फळ

कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले, गटविकास अधिकारी सोपान अकेले, पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी बाळराजे आवारे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु ‘माझ्या मागण्या राज्य निवडणूक आयोगाकडे आहेत. त्यांनी सकारात्मक लेखी उत्तर द्यावे’, अशी स्पष्ट भूमिका बाळराजे आवारे यांनी मांडली. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली.

Comments are closed.