बकरीचे संगोपन बंदी …
बकरी हा मानवाच्या अन्नाची सोय करणारा प्राणी आहे. बकऱ्याचे मांस हा अनेक माणसांच्या आहाराचा भाग असतो. तर बकरीचे दूधही आहार म्हणून उपयोगात आणले जाते. त्यामुळे बकरी पालन हा शेतकऱ्यांचा एक लाभदायक जोड व्यवसाय आहे. सरकारही बकरी पालनासाठी आर्थिक साहाय्य देत असते. देशात अशी स्थिती असताना मध्यप्रदेश या राज्यातील छतरपूर या जिल्ह्यात मात्र एक गाव असे आहे, की जेथे बकरीपालनावर पूर्णत: बंदी आहे. ही बंदी कोणत्या सरकारी नियमामुळे किंवा अन्य कोणत्या कायदेशीर कारणामुळे घालण्यात आलेली नाही. तर या बंदीमागे गावकऱ्यांची शेकडो वर्षांपासून चालत आलेली एक समजूत कारणीभूत आहे. ही समजूत इतकी प्रबळ आहे, की ती आजही मानली जाते.
या गावात जो बकरी पाळेल, त्याच्यावर अरिष्ट कोसळते, अशी ही समजूत आहे. या समजुतीमागे 300 वर्षांपूर्वी घडलेली एक ऐतिहासिक घटना आहे. 17 व्या शतकात एक मेंढपाळ या गावात स्थायिक झाला. गावाबाहेरच्या डोंगरावर एक पाण्याचे कुंड होते. पण त्या कुंडातील पाणी गावकरी घेऊ शकत नव्हते या मेंढपाळाने ते कुंड स्वच्छ केले. नंतर ते दुधाच्या स्थानी बकरीच्या दुधाने भरण्याचा निर्धार त्याने केला. पण त्याच्या सर्व बकऱ्यांचे दूध ओतले, तरी कुंड भरले नाही. इतरांच्या बकऱ्यांचे दूध भरले, तरी कुंड भरले नाही. या कुंडात लवकुशांसह सीतामातेचा वास आहे, अशीही समजूत आहे. हे कुंड भरणाऱ्या बकरी पालकाला नंतर त्रास होऊ लागला. त्याची हानी होऊ लागली. काही काळानंतर तो आणि त्याच्या ज्ञातीतील इतर बकरी पालकांना गावातून विस्थापित व्हावे लागले. त्याची ही अवस्था कुंडात वास असलेल्या सीतामातेच्या शापामुळे झाली, अशी समजून रुढ झाली. परिणामी, हे कुंड दुधाने भरण्याचा मोह कोणालाही होऊ नये. म्हणून गावात बकऱ्या पाळण्यावरच लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंदी आणली. ती आजही आहे.
Comments are closed.