होर्मुझमध्ये भारतीय खलाशांच्या तैनातीवर बंदी
सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी : भारतीयांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हल्ल्यानंतर निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आखाती प्रदेशातील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांच्या नवीन तैनातीवर बंदी घातली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत एक मोठे पाऊल उचलले आहे. सागरी प्रशासन महासंचालनालयाने (डीजीएमए) जहाज मालक, जहाज व्यवस्थापन कंपन्या आणि भरती एजन्सींना पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांना तैनात न करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘डीजीएमए’ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत अनेक महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. पर्शियन आखात, होर्मुझची सामुद्रधुनी आणि आसपासच्या समुद्री भागात कार्यरत असलेल्या सर्व जहाजांच्या कप्तानांनी (मास्टर्सनी) अत्यंत कडक सुरक्षा दक्षता बाळगावी, असे नियमावलीमध्ये नमूद करण्यात आले आहे. खलाशांनी संबंधित प्राधिकरणांनी जारी केलेले नौकानयनविषयक इशारे, सुरक्षा सूचना आणि नवीनतम अद्यतनांवर सतत लक्ष ठेवले पाहिजे, तसेच आंतरराष्ट्रीय जहाज आणि बंदर सुरक्षा संहितेअंतर्गत सर्व सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, असेही सांगण्यात आले आहे.
अलीकडील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दिशानिर्देश
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या सूचना एमटी अल बहिया आणि एमटी मोम्बासा या दोन जहाजांवरील अलीकडील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आल्या आहेत. दोन्ही जहाजांवर 30 भारतीय खलाशांसह एकूण 46 कर्मचारी होते. एमटी अल बहियावरील एक भारतीय खलाशी ठार झाला. तर एमटी मोम्बासावरील नऊ भारतीय नागरिक जखमी झाले आहेत.
सरकार रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली स्थापित करणार
समुद्रातील वाढत्या हल्ल्याच्या घटनांनंतर केंद्र सरकारने पोलीस महासंचालनालयाला एक रिअल-टाइम डॅशबोर्ड विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांमध्ये पर्शियन आखात, होर्मुझची सामुद्रधुनी आणि ओमानच्या आखातात कार्यरत असलेल्या प्रत्येक जहाजावरील भारतीय खलाशांविषयी माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याचा उल्लेख आहे.
केंद्रीय मंत्र्यांकडून माहिती
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी जहाजबांधणी महासंचालनालयाला निर्देश दिले आहेत. भारतीय खलाशांची जहाजावर उपस्थित असल्याची खात्री करावी आणि त्यांची संपूर्ण माहिती एका केंद्रीकृत डॅशबोर्डवर नोंदवावी असे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत सुनिश्चित करता येईल, असे सरकारने म्हटले आहे. सध्याची सुरक्षा परिस्थिती पाहता, भारतीय खलाशांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत खबरदारीचे उपाय सुरू राहतील, असेही सोनोवाल यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.