ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील

स्व. आर.आर.आबांनी जशी डान्स बार बंदी केली तशीच ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, अशी मागणी आज विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केली.

विधानसभेत बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, “ऑनलाईन गेमिंगमुळे युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. आर्थिक हव्यासापोटी व जाहिरातबाजीला बळी पडून युवक ऑनलाईन गेमिंगकडे आकर्षित होत आहे. तरुण पिढी ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. यात पैसे गमावल्याच्या नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाची पाऊले उचलली आहेत, त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.”

कैलास पाटील म्हणाले, या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास तरुण पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन गेम बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष कायदे अस्तित्वात नाहीत. परंतु, ऑनलाइन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फतच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गतचे नियम राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केली आहे, त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे सुतोवाच केले.

Comments are closed.