BAN vs IRE: मीरपुर कसोटीमध्ये भूकंपाचा धक्का! मैदान हादरले; VIDEO
बांग्लादेश आणि आयर्लंड यांच्यात मीरपुरमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान शुक्रवारी सकाळी आलेल्या भूकंपामुळे सामना थोड्या वेळासाठी थांबवावा लागला. जरी धक्के जोरदार नसले तरी सुरक्षेच्या कारणास्तव खेळ तत्काळ रोखण्यात आला आणि अवघ्या 30 सेकंदांत पुन्हा सुरूही करण्यात आला.
शुक्रवारी बांग्लादेशसह भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये सकाळी 10:08 वाजता भूकंपाचे झटके जाणवले. रिश्टर स्केलवर तीव्रता 5.7 मोजली गेली आहे. बांग्लादेशात भूकंपामुळे हानी झाली असून सहा जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे.
भूकंपाचा धक्का बसताना मीरपुरच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये तिसऱ्या दिवसाचा पहिला सत्र सुरू होता. आयर्लंडच्या डावातील 56वा ओवर मेहिदी हसन मिराज टाकत असताना अचानक मैदान हादरले आणि खेळाडूंना धक्का जाणवला. त्यानंतर सामना तातडीने थांबवण्यात आला. अल्पविराम एक मिनिटही न चालता अवघ्या अर्ध्या मिनिटात खेळ पुन्हा सुरू करण्यात आला.
मीरपुर कसोटीमध्ये बांग्लादेशने पहिल्या डावात 476 धावांचा डोंगर उभारला आहे. दुसऱ्या दिवसअखेर आयर्लंडच्या अर्ध्या संघाला तंबूत धाडण्यात यश मिळाले होते.
तिसऱ्या दिवशी मात्र आयर्लंडने चांगली लढत दिली. स्टीफन डोहिनी आणि लोरकान टकर यांनी सहाव्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. डोहिनी 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर अँडी मॅकब्रिन खाते न उघडता बाद झाले. नंतर जॉर्डन नील आणि टकर यांनी आठव्या विकेटसाठी 74 धावांची निर्णायक भागीदारी केली. नील केवळ एका धावांनी अर्धशतक हुकवून बाद झाले.सामना रोमांचक टप्प्यात प्रवेश करत असून पुढील सत्रात दोन्ही संघांकडून चुरशीची लढत अपेक्षित आहे.
Comments are closed.