BAN vs WI: अलिक अथानाझ आणि शाई होप यांच्या स्फोटक खेळी, वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 14 धावांनी पराभव करून T20 मालिका जिंकली.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाची सुरुवात खास झाली नाही आणि ब्रँडन किंग केवळ 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर ॲलेक अथानाझ आणि कर्णधार शाई होप यांनी शानदार फलंदाजी करताना डाव सांभाळला. दोघांनी मिळून केवळ 59 चेंडूत 105 धावांची स्फोटक भागीदारी केली. अलेक अथानाझने 33 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर कर्णधार शाई होपने 36 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावांची खेळी केली.

मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव थोडा गडगडला. मधल्या फळीतील फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले. रदरफोर्ड खातेही न उघडता बाद झाला, तर पॉवेल (३१ धावा) आणि जेसन होल्डर (४ धावा) हेही स्वस्तात बाद झाले. त्यामुळे संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 149 धावा करता आल्या.

बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने अप्रतिम गोलंदाजी करत ३ बळी घेतले, तर नसूम अहमद आणि रिशाद हुसेन यांनी २-२ बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर सैफ हसन अवघ्या 5 धावा करून बाद झाला. मात्र, तनजीद हसनने एक टोक सांभाळताना 48 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावांची शानदार खेळी केली. पण दुसऱ्या टोकाकडून त्याला फारशी साथ मिळू शकली नाही.

कर्णधार लिटन दास (२३ धावा), तौहीद हृदय (१२ धावा) आणि झाकीर अली (१७ धावा) हे काही काळ टिकले, पण संघाला लक्ष्यापर्यंत नेऊ शकले नाहीत. उर्वरित फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आणि बांगलादेशचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 135 धावाच करू शकला.

वेस्ट इंडिजसाठी रोमॅरियो शेफर्ड आणि अकेल होसेन यांनी घातक गोलंदाजी करत प्रत्येकी ३ बळी घेतले. तर जेसन होल्डरने २ बळी घेतले.

या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेतील 2-1 अशा पराभवाचा बदलाही त्याने घेतला.

Comments are closed.