वांद्रे–वर्सोवा सी लिंकवरून थेट वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार
सध्या वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे पुढील दोन वर्षांत तो पूर्ण होईल. यासोबत सी लिंकला दहिसरपर्यंत आणि नंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुंबईतील 60 टक्के वाहतूक उचलत आहे. त्याला समांतर मार्ग जोडून सी लिंकपासून भाईंदर-विरारपर्यंत तयार होत असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या कार्यक्रमाला क्रेडाईचे माजी अध्यक्ष डॉमिनिक रोमल, सचिव ऋषी मेहता, माजी सचिव धवल अजमेरा, मुख्य कार्यकारी अधिकारी केवल वलांभिया तसेच रिअल इस्टेट व्यवसायातील तज्ञ उपस्थित होते.
80 मजली इमारत 120 दिवसांत
जगभरात उपलब्ध असलेले नवीन तंत्रज्ञान मुंबईत आणायला पाहिजेत. आज बांधकाम क्षेत्रात अशा तंत्रज्ञानामुळे 80 मजली इमारत केवळ 120 दिवसांत बांधली जाऊ शकते. आज मुंबईत मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधेची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
क्लस्टर डेव्हलमपेंटची संधी
मुंबईत पुनर्विकासाबरोबरच स्लम पुनर्विकास हा दुसरा मोठा संधीचा मार्ग आहे. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंटमध्येदेखील नवीन संधी निर्माण होत आहेत. आज मुंबईत जगातील सर्वोत्तम वास्तुकला, आयकॉनिक इमारती, उत्कृष्ट सुविधा दिसत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तिसरी मुंबई 'एज्युकेशन हब'
अटल सेतूमुळे तिसरी मुंबई उभारण्याची संधी खुली झाली आहे. तिसऱ्या मुंबईत एज्युकेशन सिटी उभारण्यात येणार आहे. ही नवी मुंबई विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असेल. केंद्र सरकारने परदेशी विद्यापीठांना हिंदुस्थानात येण्याची परवानगी दिल्यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण येथे देता येणार आहे. येथे 300 एकर जमिनीवर जगातील सर्वोच्च 12 विद्यापीठांना वसवण्याची योजना असून त्यांना जमीन आणि काही पायाभूत सुविधा शासनाकडून दिल्या जातील. आज सात विद्यापीठांशी सामंजस्य करार झाले आहेत, त्यापैकी काही विद्यापीठांची संकुले सुरू करत आहेत. एकूण एक लाख निवासी विद्यार्थी येथे राहतील, असेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.