T 20 वादानंतर बांगलादेशचे आयसीसीवर फुत्कार; बोर्ड निवडणुकांमुळे वातावरण तापले
बांगलादेश क्रिकेटसाठी हे वर्ष वादाचे ठरत आहे. बीसीसीआय आणि आयसीसीसोबतच्या संघर्षामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) आधीच चर्चेत होते आणि आता बोर्ड निवडणुकांसंदर्भात एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. मुस्तफिजुर रहमानवरील आयपीएल बंदीच्या वादानंतर, बीसीबीने २०२६ च्या टी२० विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच, बांगलादेश सरकारने अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, बीसीबी निवडणुकीची चौकशी सुरू केली.
बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सध्या एका मोठ्या वादात अडकले आहे. निवडणुकीतील अनियमिततेच्या आरोपांची सरकारी चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे अनेक वक्तव्ये समोर आली आहेत. एका माजी प्रशासकानेही आयसीसीला उघडपणे धमकी दिली आहे. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेटच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत.
बीसीबीने सरकारला सूचक इशारा दिला की, जर अत्याधिक हस्तक्षेप सुरूच राहिला, तर हे प्रकरण आयसीसीपर्यंत जाऊ शकते. तथापि, एसीसीचे माजी सीईओ सय्यद अशरफुल हक यांनी या प्रकरणी एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी म्हटले की, बीसीबीने आयसीसीचा आधार घेणे ही केवळ स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिलेली “धमकी” होती. वस्तुस्थिती अशी आहे की, बीसीबी थेट राष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या (NSC) अखत्यारीत येते.
अशरफुल यांच्या मते, जर बीसीबी योग्यरित्या काम करत नसेल किंवा निवडणुकीत अनियमितता सिद्ध झाली, तर एनएससीला बोर्ड बरखास्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हे नियम कायद्यात आधीच नमूद आहेत.
अशरफुल हक यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात आयसीसी फार काही करू शकत नाही, कारण आयसीसी केवळ मार्गदर्शक तत्त्वे देते आणि देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. जर बीसीबी आपल्या घटनेनुसार काम करत असेल, तर आयसीसी हस्तक्षेप करणार नाही. त्यांनी पाकिस्तानचे उदाहरण दिले, जिथे बोर्डाचे अध्यक्ष अनेक वेळा बदलले, पण आयसीसीने हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे, आयसीसीला ‘मालक’ नव्हे, तर ‘भागीदार’ मानले पाहिजे.
बांगलादेशचे क्रीडा मंत्री अमीनुल हक यांनी स्पष्ट केले आहे की, सरकार कोणताही घाईचा निर्णय घेणार नाही. प्रथम चौकशी अहवालाचे पुनरावलोकन केले जाईल आणि आयसीसीशी सल्लामसलत केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. आता सर्वांचे लक्ष चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे लागले आहे. जर आरोप सिद्ध झाले, तर बीसीबीवर मोठी कारवाई निश्चित मानली जात आहे.
टी-२० विश्वचषकादरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्यातील संघर्ष स्पष्टपणे दिसून आला होता. अखेरीस, बांगलादेशने टी-२० विश्वचषकातून माघार घेतली आणि त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला. त्यानंतरही बांगलादेशकडून बीसीसीआय आणि आयसीसीवर अनेक आरोप होत आहेत.
Comments are closed.