मोठी बातमी! बोर्ड केंद्रीय करार जाहीर; स्टार खेळाडूंची पदावनती, ए प्लस श्रेणी रद्द

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) २०२६ साठीच्या केंद्रीय कराराची घोषणा करताना काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. राष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूंच्या नव्या करार यादीत वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद आणि ज्येष्ठ फलंदाज मुशफिकुर रहीम यांना खालच्या श्रेणीत डिमोट करण्यात आले आहे.
२०२५ मध्ये तस्कीन अहमद हा ए-प्लस श्रेणीत एकमेव खेळाडू होता. मात्र यंदा बीसीबीने ए-प्लस गटच रद्द करत त्याला ए श्रेणीत समाविष्ट केले आहे. या गटात कसोटी कर्णधार नजमुल हुसेन शांतो, वनडे कर्णधार मेहदी हसन मिराज आणि टी-२० कर्णधार लिटन दास यांचा समावेश आहे. ए श्रेणी ही बीसीबीच्या करार संरचनेतील दुसरी सर्वोच्च पातळी मानली जाते. विशेष म्हणजे यावर्षी कोणत्याही खेळाडूला ए-प्लस श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही.
तस्कीनला डिमोट करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. अलीकडील काळात त्याची गोलंदाजी प्रभावी राहिली असतानाही हा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संघ व्यवस्थापनाने तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यावरचा कामाचा ताण कमी केला होता.
दरम्यान, अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमलाही धक्का बसला आहे. २०२५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या मुशफिकुरला गेल्या वर्षी ए ग्रेडमध्ये स्थान होते, मात्र यंदा त्याला बी ग्रेडमध्ये घसरवण्यात आले आहे. बी श्रेणीत एकूण दहा खेळाडूंचा समावेश असून कसोटी तज्ज्ञ मोमिनुल हक, तैजुल इस्लाम आणि शादमान इस्लाम यांचाही त्यात समावेश आहे.
शादमान इस्लाम हा ग्रेड सी मधून बी मध्ये बढती मिळालेल्या चार खेळाडूंमध्ये एक आहे. त्याच्यासोबत तनजीद हसन, रिशाद हुसेन आणि महेदी हसन यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. बीसीबीने यंदा ग्रेड डी श्रेणीचा विस्तार केला असून या गटात सैफ हसन आणि नूरुल हसन यांच्यासह सात खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, बांग्लादेश संघ १२, १४ आणि १६ मार्च रोजी घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. या मालिकेकडे नव्या करारानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.