BAN vs PAK: फायनलमध्ये बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव; वनडे फॉरमॅटमध्येही नाचक्की!

बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव करून 3 सामन्यांची मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली आहे. ढाका येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 290 धावांचे आव्हान ठेवले होते, ज्यामध्ये तंजीद हसनने 107 धावांची शानदार खेळी करत आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 50 षटकांत 279 धावांपर्यंतच पोहोचू शकला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पाकिस्तानला हरवण्याची ही सातवी वेळ आहे.
291 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या 17 धावांत त्यांचे 3 फलंदाज बाद झाले. मोहम्मद रिझवानसह वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याने पाकिस्तानची स्थिती 5 बाद 82 अशी झाली होती. अशा कठीण प्रसंगी सलमान आगाने झुंजार शतक (106 धावा) झळकावत साद मसूद, फहीम अशरफ आणि शाहीन आफ्रिदीसोबत महत्त्वाच्या भागीदारी केल्या आणि पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, 48 व्या षटकात सलमान आगा बाद झाला आणि सामन्याचे पारडे पुन्हा बांगलादेशच्या बाजूने झुकले.
शेवटच्या 2 षटकांत पाकिस्तानला विजयासाठी 28 धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदीने 49 व्या षटकाच्या सुरुवातीला दोन षटकार मारून थरार निर्माण केला, पण मुस्तफिजुर रहमानने शेवटच्या चेंडूवर हॅरिस रौफला बाद करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला. शेवटच्या षटकात रिशाद हुसेनने अचूक गोलंदाजी करत आफ्रिदीला मोठे फटके मारण्यापासून रोखले आणि बांगलादेशचा विजय निश्चित केला.
Comments are closed.