बांगलादेश क्रिकेटपटूंनी नाक दाबताच, BCB चा मोठा निर्णय, नजमूल इस्लामची हकालपट्टी

ढाका: बांगलादेशचा माजी कॅप्टन तमीम इक्बाल यानं भारतासोबतचा वाद चर्चेतून मिटवा असं म्हटलं होतं. त्यावर बीसीबीचे संचालक नजमूल इस्लाम त्याला भारताचा एजंट म्हणाले होते. यामुळं बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. बांगलादेश क्रिकेट वेलफेअर असोसिएशनकडून पत्रकार परिषद घेत नजमूल इस्लामच्या राजीनाम्यापर्यंत खेळाडू कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळणार नाहीत, असं म्हटलं. यामुळं बांगलादेश प्रीमिअर लीगची पहिली मॅच होऊ शकलेली नाही. टॉससाठी मॅच रेफरी मैदानात आले मात्र कॅप्टन आलेच नाहीत, या सर्व प्रकारानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं नजमूल इस्लाम यांना पदावरुन हटवलं आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्या पत्रकानुसार सध्याच्या घटनांचा आढावा आणि संघटनेच्या हितासाठी बीसीबीच्या अध्यक्षांनी नजमूल इस्लाम यांना वित्त कमिटीच्या चेअरमन पदाच्या जबाबदारीतून तात्काळ मुक्त केल्याचं सांगितलं. बीसीबीच्या संविधानाच्या कलम 31 नुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना मिळालेल्या अधिकाराचा वपर करत नजमूल इस्लाम यांना पदावरुन हटवण्यात आलं. तर, नजमूल इस्लाम यांच्याकडील कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात बीसीबीच्या अध्यक्षांकडे असेल.

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं म्हटलं की  पुढील आदेशापर्यंत बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष वित्त समितीचे प्रभारी अध्यक्ष असतील. क्रिकेटपटूंचं हित ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं बोर्डानं म्हटलं. खेळाडूंचा सन्मान कायम राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचं बीसीबीनं म्हटलं.

नजमूल इस्लाम यांना पदावरुन हटवलं नाही तर खेळाडू कोणत्याही फॉरमॅटमध्ये एकही मॅच खेळणार नाही, अशी भूमिका बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी घेतली होती. सर्व खेळाडूंनी बांगलादेश प्रीमिअर लीग 2026 च्या पहिल्या सामन्यावर बहिष्कार घातला होता.  आज नौखाली एक्सप्रेस विरुद्ध चट्टोग्राम रॉयल्स यांच्यात पहिली मॅच होणार होती. मात्र, मॅच वेळेवर सुरु होऊ शकली नाही. टॉससाठी कोणताही कॅप्टन मैदानावर पोहोचला नाही. बीसीबीनं सर्व खेळाडूंना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं सर्व क्रिकेटपटूंनी आव्हानात्मक काळात सहकार्य करावं आणि व्यावसायिकता दाखवून द्यावी आणि समर्पण भावनेतून बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये सहकार्य करावं, असं म्हटलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.