शेख हसीना यांच्या ढाक्यातून पलायनाचे चित्रीकरण करणाऱ्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू; कुटुंबियांकडून संशय व्यक्त

बांग्लादेश हवाई दलाचे माजी अधिकारी के. एम. तहसीफ सौरी यांचा मृतदेह गुरुवारी ढाक्यातील एका नदीत संशयास्पद परिस्थितीत सापडला. ते एक दिवसापूर्वी बेपत्ता झाले होते. ५ ऑगस्ट, २०२४ रोजी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना देशातून पळून जात असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती तहसिफ सौरी होती. त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली असून त्याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे.

‘द डेली स्टार’च्या वृत्तानुसार, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सौरीचा मृतदेह टोंगी बंदर घाट परिसरातून ताब्यात घेतला. त्याच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल फोन आणि घड्याळाच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शहीद सुहरावर्दी मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला.

तहसिफ सौरी आपल्या कुटुंबासोबत उत्तरा येथील सेक्टर १८ मध्ये राहत होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. बुडून मृत्यू झाल्याचा संशय असला तरी, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. सौरीचे वडील, के. एम. इनायतुल करीम हिलाल यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा कधीकधी स्वतःच्या सुरक्षेबद्दल भीती व्यक्त करत असे. ते म्हणाले, तहसिफ मला सांगायचा की त्याला थोडी भीती वाटत आहे, पण त्याला नक्की कशाची काळजी वाटत आहे हे त्याने कधीच सांगितले नाही.

सौरीला गैरशिस्तीच्या कारणावरून हवाई दलातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर त्याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड, नेत्रा न्यूज आणि अगदी अलीकडे व्हर्गो टोबॅकोमध्ये काम केले. घटनेच्या दिवसाची आठवण सांगताना सौरीचे वडील म्हणाले, संध्याकाळच्या आधी, तहसिफचा एक मित्र दीप त्याला बोलावण्यासाठी आला. तहसिफ त्याच्या आईला मी दीपशी बोलेन असे सांगून खाली गेला, पण तो कधीच घरी परतला नाही.

तहसिफ सौरीच्या मृत्यूने लक्ष वेधले आहे कारण त्याचे नाव माजी पंतप्रधान शेख हसीना देश सोडत असल्याच्या एका व्हिडिओशी जोडले गेले होते. ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या सार्वजनिक आंदोलनानंतर, शेख हसीना सरकार कोसळले, ज्यामुळे त्यांना ढाका सोडावे लागले. त्या लष्करी हेलिकॉप्टरने निघाल्या आणि नंतर बांगलादेश हवाई दलाच्या सी-१३०जे हर्क्युलस विमानाने हिंदुस्थानातील हिंडन एअरबेसवर पोहोचल्या. शेख हसीना सध्या हिंदुस्थानात निर्वासित म्हणून राहत आहेत. मात्र, पोलिसांचे म्हणणे आहे की सौरीचा मृत्यू आणि त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ यांच्यात सध्या तरी कोणताही थेट संबंध प्रस्थापित झालेला नाही.

Comments are closed.