16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियापासून रोखण्यासाठी कोर्टाचे बांगलादेश सरकारला निर्देश; अल्गोरिदमच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती
16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी अनिवार्य अंतरिम मार्गदर्शक तत्त्वे तयार करा, असे निर्देश बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. तसेच सोशल मीडियावरील अल्गोरिदमच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या मजकुराचा लहान मुलांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालय विभागाने रविवारी एका याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले. 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. ‘प्रोथोम आलो’ या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
न्यायमूर्ती सिकदर महमुदुर राझी आणि न्यायमूर्ती फातिमा अन्वर यांच्या खंडपीठाने पोस्ट्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभागाचे सचिव आणि बांगलादेश टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी कमिशनचे अध्यक्ष यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने सायबर सुरक्षा तज्ज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती तातडीने स्थापन करण्यास सांगितले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अल्गोरिदम नियंत्रित फीडचा मुलांवर होणारा परिणाम या समितीकडून तपासला जाणार आहे.
अल्गोरिदमच्या माध्यमातून मुलांना कोणत्या प्रकारचा मजकूर दाखवला जातो, अशा शिफारसींचा त्यांच्या वर्तनावर कसा परिणाम होतो आणि त्यांच्या एकूण विकासावर त्याचे काय परिणाम होतात, याचा अभ्यास समिती करणार आहे. या अभ्यासाच्या आधारे सोशल मीडिया वापराबाबत आवश्यक नियम तयार करण्यासाठी सरकारला मदत होणार आहे.
याचिकेत नेमके काय म्हटले आहे?
सर्वोच्च न्यायालयातील वकील मोहम्मद फैसल दस्तगीर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ही याचिका दाखल केली होती. त्यांनी स्वतः न्यायालयात उपस्थित राहून युक्तिवाद केला. 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही स्वतंत्र नियमावली नसल्यामुळे त्यांना सोशल मीडियाचा अमर्याद वापर करावा लागत आहे. याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अतिरिक्त स्क्रीन टाइममुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे विविध संशोधनांमधून समोर आले आहे. यामध्ये दृष्टीदोषासारख्या समस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मुलांच्या सोशल मीडिया वापराचे नियमन करण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करणे आवश्यक असल्याचे दस्तगीर यांनी म्हटले.
तसेच अल्गोरिदम नियंत्रित फीडचा मुलांवर होणारा परिणाम तपासण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन न करणे आणि 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालणारे राष्ट्रीय धोरण तयार करण्यात अपयशी ठरणे, हे बेकायदेशीर आणि अधिकाराबाहेरचे का ठरू नये, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अनेक देशांकडून मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध
मुलांचे मानसिक आरोग्य, शारीरिक स्वास्थ्य आणि विकास यावर सोशल मीडियाचा होणारा परिणाम लक्षात घेऊन जगभरातील अनेक देशांनी यासंदर्भात कठोर नियम करण्यास सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलियाने डिसेंबर 2025 मध्ये 16 वर्षांखालील मुलांना प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास बंदी घातली. अशा प्रकारची वयोमर्यादा लागू करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला. या नियमांनुसार 16 वर्षांखालील मुलांना खाते उघडण्यापासून किंवा आधीपासून असलेले खाते सुरू ठेवण्यापासून रोखण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना योग्य ती पावले उचलणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इंडोनेशियाने 28 मार्च 2026 पासून 16 वर्षांखालील मुलांना ‘उच्च जोखीम’ असलेल्या सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खाते वापरण्यास बंदी घातली. अशा प्रकारचे निर्बंध लागू करणारा आग्नेय आशियातील इंडोनेशिया हा पहिला देश ठरला.
मलेशियानेही जून 2026 पासून वय पडताळणीची प्रक्रिया लागू केली आहे. त्यानुसार 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया खाते उघडता येणार नाही. आधीपासून खाते असलेल्या वापरकर्त्यांनाही त्यांचे वय पडताळून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ब्रिटनमध्ये 2027 च्या वसंत ऋतूपासून 16 वर्षांखालील मुलांना प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी घालण्याची योजना आहे. यासंदर्भातील सुरुवातीचे नियम डिसेंबर 2026 पर्यंत संसदेसमोर मांडले जाण्याची अपेक्षा आहे. याशिवाय 16 आणि 17 वर्षांच्या किशोरवयीन मुलांसाठी रात्रीच्या वेळी सोशल मीडिया वापरावर मर्यादा घालणे आणि मुलांसाठी सतत स्क्रोल करत राहण्याची (इन्फिनिट स्क्रोल) सुविधा बंद करण्याचाही ब्रिटन सरकार विचार करत आहे.
Comments are closed.