भारताच्या या कृतीमुळे बांगलादेश संतापला आहे.
भारतीयांसाठी व्हिसा सेवा तात्पुरत्या स्थगित
वृत्तसंस्था/ ढाका, नवी दिल्ली
भारत आणि बांगलादेशमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाने कॉन्सुलर आणि व्हिसा सेवा सोमवारपासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत. बांगलादेशी विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी भारताने बांगलादेशच्या चितगाव येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्रातील व्हिसा सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केल्या होत्या. शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचारानंतर रविवारीच हा निर्णय घेण्यात आला होता.
बांगलादेश उच्चायुक्तालयाने एक निवेदन जारी करत ‘अपरिहार्य परिस्थितीमुळे, नवी दिल्लीतील मिशनमधील सर्व कॉन्सुलर आणि व्हिसा सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत’ असे स्पष्ट केले आहे. या गैरसोयीबद्दल मिशनने खेद व्यक्त केला आहे. हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात सध्या तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान भारतानेही अलर्ट जारी करत बांगलादेशशी असलेले संबंध टिकवण्यासाठी सावध पवित्रा घेतलेला दिसून येत आहे.
12 डिसेंबर रोजी ढाका येथील विजयनगर क्षेत्रात इंकलाब मंचाचा प्रवक्ता हादीवर प्रचारादरम्यान गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. उपचारादरम्यान हादीचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर बांगलादेशच्या विविध हिस्स्यांमध्ये हिंसा आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. यादरम्यान चितगावमध्ये भारताच्या सहाय्यक उच्चायुक्तांच्या निवासस्थानावर गुरुवारी दगडफेकीची घटना घडली होती.
या पार्श्वभूमीवर चितगाव येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्रातील व्हिसा प्रक्रिया अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आली आहे. सुरक्षा स्थितीच्या समीक्षेनंतर व्हिसा अर्ज केंद्र पुन्हा सुरु करण्यासंबंधी पुढील काळात घोषणा केली जाणार आहे. पुढील निर्देशापर्यंत व्हिसा केंद्राला भेट देऊ नका, अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करा असे आवाहन सध्या अर्जदारांना करण्यात आले आहे. अर्जदार आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा विचारात घेत खबरदारीदाखल हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर बांगलादेशच्या सिलहट येथील भारतीय सहाय्यक उच्चायोग कार्यालय आणि व्हिसा अर्ज केंद्रावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
Comments are closed.