भारत दौऱ्यावर बहिष्कार बांग्लादेशच्या अंगलट? 240 कोटींचा फटका, BCCIही पाठ फिरवणार?
बांग्लादेशने पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ भारतात न पाठवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. गुरुवारी बांग्लादेश सरकारने हा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
बांग्लादेशने भारतात जाण्यास नकार दिल्याने आणि आयसीसीच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेवर बहिष्कार टाकल्याने बीसीबीला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. एका अहवालानुसार, जर बांग्लादेश टी20 विश्वचषकातून माघार घेतो, तर बोर्डाला सुमारे 240 कोटी रुपये इतकं नुकसान होण्याची शक्यता आहे. ही रक्कम प्रामुख्याने आयसीसीकडून मिळणाऱ्या वार्षिक महसूल वाटपाशी संबंधित आहे, जो बीसीबीच्या एकूण उत्पन्नाचा मोठा भाग आहे.
दरम्यान, आयसीसीने बुधवारी बांग्लादेशला अल्टिमेटम दिला होता. भारतात खेळण्यास सहमती न दर्शवल्यास त्यांच्या जागी दुसऱ्या संघाचा समावेश करण्यात येईल, असं आयसीसीने स्पष्ट केलं होतं. आयसीसीने हेही सांगितलं होतं की भारतात खेळाडू, अधिकारी किंवा चाहत्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही.
बांग्लादेशला गुरुवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, देशाचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी खेळाडूंशी बैठक घेतल्यानंतर आयसीसीचा दृष्टिकोन स्वीकार्य नसल्याचं जाहीर केलं. बांग्लादेशच्या जागी स्कॉटलंड संघ पुढील पर्याय म्हणून चर्चेत आहे. मात्र आयसीसीने क्रिकेट स्कॉटलंडशी अधिकृत संपर्क साधला आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
या निर्णयाचा परिणाम केवळ आयसीसीच्या महसुलापुरताच मर्यादित राहणार नाही. प्रसारण हक्क आणि प्रायोजकत्वातून मिळणाऱ्या उत्पन्नातही मोठी घट होण्याची शक्यता आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात बीसीबीच्या एकूण उत्पन्नात 60 टक्क्यांहून अधिक घट होऊ शकते. याचा परिणाम भारताच्या ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये नियोजित बांग्लादेश दौऱ्यावरही होऊ शकतो.
दरम्यान, बांग्लादेशला भारतात चार सामने (तीन कोलकात्यात आणि एक मुंबईत) खेळायचे होते. सुरक्षा कारणांचा मुद्दा तेव्हा पुढे आला, जेव्हा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर काढण्यात आलं.
या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठं नुकसान बांग्लादेशच्या खेळाडूंचं होत आहे. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर खेळण्याची संधी त्यांना गमवावी लागत आहे. खेळाडूंना आर्थिक नुकसान होणार नाही, असं आश्वासन देण्यात आलं असलं तरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंना प्रेरणा देणारी गोष्ट ही केवळ आर्थिक लाभ नसून स्पर्धात्मक आव्हान आणि प्रतिष्ठा असल्याचं वास्तव आहे.
Comments are closed.