आयसीसीचा कडक निर्णय: बांगलादेशची टी20 वर्ल्ड कपमधून हकालपट्टी, नव्या संघाची एन्ट्री निश्चित

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 संदर्भात बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि बांगलादेश संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या महिन्यात होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून बांगलादेश बाहेर फेकला जाण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आयसीसीकडून देण्यात आलेली अंतिम मुदत संपण्याच्या मार्गावर असून, येत्या काही तासांत मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. बीसीबीकडून सुरू असलेल्या नाट्यावर आयसीसी आता कुठलीही तडजोड करण्याच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डला 21 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय कळवण्यास सांगितले आहे. दरम्यान, बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आरिफ नजरूल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत बांगलादेश संघ भारतात येऊन टी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळणार नाही. या भूमिकेमुळेच बांगलादेशचे वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात आले आहे.

जर बांगलादेशने माघार घेतली, तर त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाची थेट एन्ट्री होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आयसीसी रँकिंगनुसार स्कॉटलंड हा पुढचा पात्र संघ असून, तो बांगलादेशच्या जागी ग्रुप C मध्ये दिसू शकतो. या गटात सध्या वेस्ट इंडीज, इटली आणि नेपाळ हे संघ आहेत.

डेडलाइनच्या अवघ्या एक दिवस आधी आरिफ नजरूल यांनी मंगळवारी सांगितले की, आयसीसीच्या कोणत्याही अटी मान्य केल्या जाणार नाहीत. पाकिस्तानचे उदाहरण देत त्यांनी याआधीही व्हेन्यू बदल झाल्याचे सांगितले. मात्र वास्तवात, पाकिस्तानी संघासाठी शेड्यूल जाहीर होण्याआधीच श्रीलंका हे ठिकाण निश्चित करण्यात आले होते, हेही तितकेच सत्य आहे.

कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमधून मुस्तफिजुर रहमानला वगळल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेग आला. त्यानंतर भारतातील सुरक्षेचे कारण पुढे करत बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला. आयसीसी आणि बीसीबी यांच्यात अनेक फेऱ्यांच्या चर्चा होऊनही तोडगा निघालेला नाही.

आता पुढील काही तासांत अंतिम निर्णय होईल. एकतर बीसीबी काही अटींवर भारतात खेळण्यास तयार होईल, अन्यथा आयसीसी बांगलादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर काढून स्कॉटलंडची अधिकृत घोषणा करेल. आयसीसी आपली भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वाचे लक्ष या निर्णायक घडामोडीकडे लागले आहे.

Comments are closed.