क्रिकेटविश्व हादरलं! बांगलादेशच्या महिला कर्णधाराचे सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचे आरोप; म्हणाली


जहाँआरा आलमने माजी निवडकर्ता मंजुरुल इस्लामवर छळाचा आरोप केला आहे. बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जहानारा आलम हिने माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी सदस्य मंजुरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. सध्या मानसिक आरोग्याच्या कारणास्तव संघाबाहेर असलेली जहानारा हिने खुलासा केला की, 2022 महिला वनडे विश्वचषकादरम्यान राष्ट्रीय संघ व्यवस्थापनातील काही लोकांकडून तिला अशोभनीय प्रस्ताव देण्यात आले होते.

तिने सांगितले की, हे प्रस्ताव नाकारल्यानंतर मंजुरुल इस्लाम यांनी तिच्या कारकिर्दीत अडथळे आणण्यास सुरुवात केली. यापूर्वीही जहानाराने बांगलादेश महिला संघाच्या कर्णधार निगार सुलताना हिच्यावर मारहाणीचे आरोप केले होते.

“अनेक वेळा अपमान झाला, पण मी बोलू शकले नाही… ” – जहानारा आलम

बांगलादेशी पत्रकार रियासत अजीम यांच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत जहानारा म्हणाली, “मला एकदा नाही तर अनेक वेळा अशोभनीय प्रस्ताव दिले गेले. जेव्हा आपण संघाशी जोडलेले असतो, तेव्हा अनेक गोष्टी सांगणे अवघड होते. कारण आपली रोजीरोटी त्यावरच अवलंबून असते.” तिने सांगितले की, अनेकदा तिने बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मदत मागितली, पण कोणीही काही कारवाई केली नाही.

CEO आणि महिला समिती प्रमुखांनीही दुर्लक्ष केले…

जहानारा म्हणाली की, तिने बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे सीईओ नजमुद्दीन चौधरी आणि महिला समितीच्या प्रमुख नादेल चौधरी यांच्याकडे वारंवार तक्रार केली, पण कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाही. जहानाराच्या मते, 2022 च्या विश्वचषकादरम्यान मंजुरुल इस्लाम यांनी पुन्हा तिच्याशी गैरवर्तन केले. ती म्हणाली की, यावेळी तिने बांगलादेश क्रिकेट बोर्डकडे तक्रार केली, पण तिला फक्त “तात्पुरता तोडगा काढू” असे सांगून प्रकरण दडपण्यात आले.

“खांद्यावर हात ठेवून जवळ येण्याचा प्रयत्न…” – जहानारा आलम

जहानाराने पुढे अजून खळबळजनक आरोप करत सांगितले की, मंजुरुल इस्लाम यांना महिला खेळाडूंशी अनावश्यक जवळीक साधायची सवय होती. “प्रि-कॅम्प दरम्यान, मी बॉलिंग करत असताना त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते वारंवार खेळाडूंना स्वतःकडे खेचत, मिठी मारत आणि कानाजवळ बोलत. आम्ही सगळ्या त्यांच्यापासून दूर राहत होतो. सामन्यानंतर हस्तांदोलनही दूरून करत होतो.”

“माझ्या पीरियड्सबद्दल विचारलं…” – जहानारा आलम

जहानाराने सर्वात धक्कादायक खुलासा केला की, “एकदा त्यांनी माझा हात पकडून विचारलं. ‘तुझ्या पीरियड्सला किती दिवस झाले?’ मी सांगितलं, तर म्हणाले – ‘पाच दिवस? उद्यापर्यंत संपले पाहिजे. संपले की मला सांग, मला बघायचं आहे.’ मी काहीही बोलले नाही, फक्त म्हटलं ‘भाऊ, मला समजलं नाही.’” ती म्हणाली की, खेळाडूंच्या मासिक पाळीची माहिती फिजिओकडे आरोग्य कारणास्तव असते, पण निवडकर्त्यांना त्याची काहीच गरज नसते.

मंजुरुल इस्लाम यांनी सर्व आरोप फेटाळले

या आरोपांनंतर मंजुरुल इस्लाम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. बाकी खेळाडूंना विचारा, मी कसा माणूस आहे.” तर बाबू नावाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, जहानारा एका दिवंगत व्यक्तीचे नाव वापरून बनावट कथा सांगत आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाची प्रतिक्रिया

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. BCB चे उपाध्यक्ष शखावत हुसेन म्हणाले, “आरोप अतिशय गंभीर आहेत. आम्हाला बसून ठरवावे लागेल की पुढे कोणती पावले उचलायची.” आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी या गंभीर प्रकरणात न्याय सुनिश्चित करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलतात.

हे ही वाचा –

RCB on Sale Explained : RCB विकायला काढली, 5 उद्योजक शर्यतीत! IPL ट्रॉफी जिंकल्यानंतरही ही वेळ का आली?, विराट कोहलीचं काय होणार?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.