बांग्लादेशचा गोलंदाज ज्याच्या भन्नाट वेगाला घाबरला पाकिस्तान! अर्धा संघ परतला तंबूत

क्रिकेटच्या मैदानावर वेगाला कौशल्याची जोड मिळाली की नाहिद राणासारखे प्रदर्शन पाहायला मिळते. पाकिस्तानचा संघ सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना आज (बुधवार, ११ मार्च) ढाकाच्या शेर ए बांग्ला नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना बांग्लादेशने ८ विकेट्सने जिंकला. त्यामध्ये नाहिदची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

नाहिदने त्याच्या वेगवान गोलंदाजीने पाकिस्तान फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याने पहिल्या पाचही फलंदाजांना बाद केले. यामध्ये त्याने साहिबजादा फरहान, माझ सदाकत, शामिल हुसैन, मोहम्मद रिजवान आणि सलमान आगा यांचा समावेश आहे. त्याने ७ षटकात २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच तो पाकिस्तानविरुद्ध वनडेमध्ये पाच किंवा पाचपेक्षा अधिक विकेट्स घेणारा दुसरा आणि घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा पहिला बांग्लादेशी गोलंदाज ठरला आहे.

साहिबजादाचा हा वनडे पदार्पणचा सामना होता. तो सर्वात आधी बाद झाला. त्याने ३८ चेंडूत २७ धावा केल्या. तो बाद झाल्यावर पाकिस्तानची स्थिती १ विकेट ४१ धावा अशी होती. त्यानंतर नाहिदने विकेट्सचा सपाटा सुरूच ठेवला. त्याला बाकी गोलंदाजांचीही चांगली साथ मिळाली. बांग्लादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराझ यानेही १० षटकात २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. त्यामुळे पाकिस्तान ३०.४ षटकात ११४ धावा करत सर्वबाद झाला.

बांग्लादेशने लक्ष्याचा पाठलाग करताना पहिली विकेट लवकर गमावली. सैफ हसन ४ धावा करत बाद झाला. त्यानंतर तंजिद हसन अहमदने नजमुल होसैन शांतो याच्यासोबत डाव सांभाळला. तंजिदने नाबाद ६७ धावा केल्या. तसेच नजमुल होसैन शांतो २७ धावा करत बाद झाला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. तसेच लिटन दास ३ धावा करत नाबाद राहिला. त्यामुळे बांग्लादेशने १५.१ षटकातच लक्ष्य गाठले.

पाकिस्तान या मालिकेत शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळत आहे. पहिला सामना जिंकल्याने यजमान संघ तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत १-० असे आघाडीवर आहेत.

टी२० विश्वचषक २०२६ नंतर पाकिस्तानचा हा पहिलाच दौरा आहे. यामध्ये अनेक खेळाडूंनी पदार्पण केले असून बाबर आझमला संघात स्थान दिले गेले नाही.

Comments are closed.