वर्ल्ड कपमधून माघार घेतल्याने खेळाडूंना मानसिक धक्का; प्रशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी सरकारला धरले धारेवर!

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये बांगलादेशचा संघ खेळत नाही. भारतामध्ये बांगलादेशच्या संघाला पुरेशी सुरक्षा मिळणार नाही, असे कारण देत तिथल्या सरकारने आपल्या टीमला या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची परवानगी नाकारली होती. या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून, संघाचे वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी माजी क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. चुकीच्या निर्णयांनी खेळाडूंची स्वप्ने धुळीला मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याच्या निर्णयावर बोलताना सलाहुद्दीन म्हणाले की, तरुण खेळाडूंचे आयुष्यभराचे स्वप्न एका झटक्यात तोडण्यात आले. त्यांनी खुलासा केला की, दोन खेळाडू तर ‘मेंटल कोमा’सारख्या (मानसिक धक्का) स्थितीत गेले होते. जेव्हा एखादा खेळाडू वर्ल्ड कप खेळायला येतो, तेव्हा तो 27 वर्षांचे स्वप्न घेऊन येतो. तुम्ही एका सेकंदात ते स्वप्न मोडून टाकता. जर हा देशहिताचा निर्णय असेल तर खेळाडू बलिदान देतील, पण त्यामुळे होणाऱ्या वैयक्तिक नुकसानीबद्दलही बोलावे लागेल.
या प्रकरणाने तेव्हा जास्त वळण घेतले जेव्हा आसिफ नजरुल यांच्या विधानांमध्ये तफावत दिसून आली. आधी त्यांनी म्हटले होते की, भारतात न खेळण्याचा निर्णय सरकारचा आहे. नंतर त्यांनी असा दावा केला की, ‘राष्ट्रीय अस्मिता’ जपण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि खेळाडूंनी मिळून हा निर्णय घेतला होता. यावर संताप व्यक्त करत सलाहुद्दीन म्हणाले की, नजरुल यांनी उघडपणे खोटं बोलले आहे. वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सरकारने खेळाडूंवर लादला होता, यात खेळाडू किंवा प्रशिक्षकांची कोणतीही भूमिका नव्हती.
मोहम्मद सलाहुद्दीन यांनी पुढे स्पष्ट केले की, सरकारने बांगलादेश टीमला वर्ल्ड कपमध्ये सहभागी न होण्यासाठी भाग पाडले. खेळायला न मिळाल्यामुळे खेळाडू अत्यंत निराश होते आणि त्यातील दोन जण तर गंभीर आजारी पडले. नजरुल आता स्वतःचा निर्णय खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या माथी मारत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
Comments are closed.