सरकार ‘क्रॅश’ होणार? बांगलादेशात पुन्हा भडका, लोक सचिवालयात घुसले; विमान दुर्घटनेचे तीव्र पडसाद

राजकीय पक्षांतील कुरबुरीमुळे त्रस्त असलेल्या बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज दुसरा धक्का बसला. ढाक्यातील विमान अपघातानंतर संतापलेले लोक रस्त्यावर उतरले आणि युनूस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक लाठय़ाकाठय़ा घेऊन थेटकेंद्रीय सचिवालयात घुसले.

ढाक्यातील एका शाळेवर सोमवारी बांगलादेशचे लढाऊ विमान कोसळले. त्यात 25 लहान मुलांसह 31 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले. या अपघाताचा सगळा राग लोकांनी युनूस सरकारवर काढला. ढाक्यात ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आणि उग्र आंदोलन केले. आमच्या मुलांचा काय दोष होता, असा आक्रोश लोक करत होते. हातात काठय़ा घेऊन शेकडो लोककेंद्रीय सचिवालयात घुसले. पोलिसांनी लाठीमार केल्याने परिस्थिती आणखीन चिघळली. सरकारने मृतांची यादी जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

मृतांचा अधिकृत आकडा लवकरच जाहीर करणार

सरकार, सैन्य, शाळा आणि रुग्णालय प्रशासन एकत्रितपणे मृतांची यादी तयार करत आहेत. ती लवकरच जाहीर केली जाईल, दाट लोकवस्तीच्या भागात हवाई दलाच्या विमानांना प्रशिक्षण दिले जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्याचे हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.