बांगलादेशचा नवा ड्रामा: अंडर-19 वर्ल्ड कपमधील 'नो हँडशेक' वादावर BCB ने दिले स्पष्टीकरण
अंडर-19 वर्ल्ड कप 2026 देखील ‘नो हँडशेक’ (हस्तंदोलन न करणे) वादामुळे चर्चेत आला आहे. 17 जानेवारी रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही. यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) निवेदन प्रसिद्ध केले आहे. बीसीबीचे म्हणणे आहे की, विरोधी संघ म्हणजेच भारतीय कर्णधाराशी हस्तांदोलन न करण्याची घटना अनवधानाने घडली.
BCB ने निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश अंडर-19 संघाचा नियमित कर्णधार अझिझुल हकीम आजारी असल्यामुळे टॉसच्या वेळी मैदानात येऊ शकला नाही. त्याच्या जागी उपकर्णधार जवाद अबरारने टॉसची जबाबदारी सांभाळली. भारतीय कर्णधाराशी हस्तांदोलन न करण्याची घटना चुकून घडली असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न बीसीबीने केला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने असेही म्हटले आहे की, भारतीय संघाचा अनादर करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता.
बीसीबीचे म्हणणे आहे की, ते या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत आणि खेळाची भावना जपणे, विरोधी संघ आणि खेळाडूंचा सन्मान राखणे हे बांगलादेशचे मूळ तत्व आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना खेळाची प्रतिष्ठा आणि खिलाडूवृत्ती जपण्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.
17 जानेवारी रोजी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला. हलका पाऊस पडत असल्यामुळे टॉसला विलंब झाला. जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी आले, तेव्हा कोणाही एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही. बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही दोन्ही कर्णधारांमध्ये हस्तांदोलन झाले नाही आणि दोन्ही खेळाडू थेट आपापल्या ड्रेसिंग रूमकडे गेले. या सर्व प्रकारामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे.
Comments are closed.