बँक खातेधारकांना 4 नॉमिनी जोडण्याचा पर्याय असेल

1 नोव्हेंबरपासून होणार अंमलबजावणी : खातेधारकांसाठी वाढणार सुविधा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पुढील महिन्यापासून बँक खातेधारक स्वत:च्या खात्याकरता कमाल 4 नॉमिनी (उत्तराधिकारी)चा पर्याय निवडू शकणार आहे. या सुविधेचा उद्देश बँकिंग प्रणालीत दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेत एकरुपता आणि दक्षता सुनिश्चित करणे आहे. अर्थ मंत्रालयाकडून गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका वक्तव्यात या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. बँकिंग कायदा (दुरुस्ती) अधिनियम 2025 च्या अंतर्गत नामांकनाशी संबंधित प्रमुख तरतुदी 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार असल्याचे वक्तव्यात म्हटले गेले आहे. बँकिंग कायदा (दुरुस्ती) अधिनियम 2025 ला 15 एप्रिल रोजी अधिसूचित करण्यात आले होते. यात 5 कायदे-भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934, बँकिंग विनियमन अधिनियम 1949, भारतीय स्टेट बँक अधिनियम 1955 आणि बँकिंग कंपन्या (उपक्रमांचे अधिग्रहण आणि हस्तांतरण) अधिनियम 1970 आणि 1980 मध्ये करण्यात आलेल्या एकूण 19 दुरुस्त्या सामील आहेत.

ग्राहकांना नव्या सुविधेचा लाभ

नव्या दुरुस्तींनुसार ग्राहक एकत्रित किंवा क्रमस्वरुपात कमाल 4 जणांना नॉमिनी म्हणून नामनिर्देशित करू शकतात. यामुळे ठेवीदार अणि त्यांच्याकडून नामनिर्देशित व्यक्तींसाठी दावा निकाली काढणे सोपे ठरणार आहे. नव्या बदलानंतर ठेवीदार स्वत:च्या पसंतीनुसार एकत्रित किंवा क्रमानुसार नामांकनाचा पर्याय निवडू शकतात. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू आणि सुरक्षा  लॉकरांसाटी नामांकनामध्ये केवळ क्रमानुसार नामांकनाचीच अनुमती असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठेवीदार कमाल 4 व्यक्तींना नॉमिनी म्हणून नामनिर्देशित करू शकतो आणि प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीसाठी हिस्सेदारी किंवा पात्रतेची टक्केवारी नमूद करू शकतो. यामुळे एकूण रकमेचे सर्व नामनिर्देशित व्यक्तींदरम्यान पारदर्शक पद्धतीने वितरण सुनिश्चित होणार असल्याचे नव्या नियमांमध्ये म्हटले गेले आहे.

ग्राहकांच्या पसंतीनुसार नामांकन सुविधा

ठेव रक्कम, लॉकरमधील वस्तूंकरता खातेधारक कमाल चार व्यक्तींचे नाव नॉमिनी म्हणून जोडू शकतो. या तरतुदींच्या अंमलबजावणीमुळे ठेवीदारांना स्वत:च्या पसंतीनुसार नामांकन करण्याची सुविधा मिळेल, तसेच बँकिंग प्रणाली दावे निकाली काढण्यात एकरुपता, पारदर्शकता आणि दक्षता सुनिश्चित होईल असे वक्तव्यात म्हटले गेले आहे. बँकिंग कंपनी (नामांकन) नियम 2025 मध्ये एकाहून अधिक नामांकन करणे, रद्द करणे आणि निर्दिष्ट करण्याची प्रक्रिया आणि निर्धारित प्रपत्रांचा तपशील देण्यात आला आहे.

Comments are closed.