देशातील 10 लाख बॅंक कर्मचारी संपवार जाणार, सरकारबरोबरची चर्चा निष्फळ, नेमकी काय आहे मागणी?
बँक कर्मचाऱ्यांच्या बातम्या : पाच दिवसांचा आठवडा असावा या मागणीवरुन बॅंक कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या 2 वर्षांआधी 5 दिवसांचा आठवडा ही मागणी मान्य झाली आहे. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं आज केंद्र सरकारबरोबर बॅंक कर्मचारी संघटनांची बैठक झाली. मात्र यामध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं बँक कर्मचारी आणि अधिकारी संपावर जाणार आहेत.
27 जानेवारी रोजी बॅंक कर्मचारी संपावर जाणार
बॅंक कर्मचारी संघटनांकडून 5 दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, 27 जानेवारी रोजी बॅंक कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 24, 25, 26 आणि 27 जानेवारीला बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे. सलगच्या तीन सुट्ट्या आणि चौथ्या दिवशी कर्मचारी संघटनांचा संप असल्याने 4 दिवस कामकाज ठप्प होणार आहे.
2 वर्षांआधी 5 दिवसांचा आठवडा ही मागणी मान्य, मात्र अंमलबजावणी झाली नाही
बॅंक कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी देविदास तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2 वर्षांआधी 5 दिवसांचा आठवडा ही मागणी मान्य झाली आहे. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या 10 वर्षांपासून 5 दिवसांचा आठवडा असावा अशी मागणी होत आहे. मात्र, अद्यापही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ती गेल्या 2 वर्षांआधी मान्य करुनही अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या मनात संतापाची भावना आहे. देशातील जवळपास 10 लाख बॅंक कर्मचारी आणि अधिकारी एक दिवसाच्या संपावर जाणार असल्याची माहिती बॅंक कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी देविदास तुळजापूरकर यांनी दिली. देशातील बॅंक व्यवहार ठप्प झाला असेल, आमचा नाईलाज आहे. आम्ही बॅंक ग्राहकांची माफी मागतो असे देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.
आरबीआय, एलआयसी, नाबार्डला 5 दिवसांचा आठवडा, मग आम्हीच काय घोडं मारलंय
सरकारच्या आडमुठेपणामुळे आम्हाला संप करावा लागत असल्याचे देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले आरबीआयएलआयसी, नाबार्डला 5 दिवसांचा आठवडा आहे. मग आम्हीच बॅंक कर्मचाऱ्यांनीच काय असं घोडं मारलंय की आम्हाला 5 दिवसांचा आठवडा नाही असे देविदास तुळजापूरकर म्हणाले. त्यामुळं बॅंक संप अटळ बनला असल्याची माहिती देविदास तुळजापूरकर यांनी दिली.
आणखी वाचा
Comments are closed.