काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्र

बारामती अपघात वृत्त: बारामती (Baramati) तालुक्यातील जळगाव क. प. गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या राज्य मार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात घडला. रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

या अपघातात मधुकर धोंडीबा जगताप (रा. भिलारवाडी) यांचा मृत्यू झाला. ते मेडद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री काम आटोपून ते आपल्या घरी परतत असताना जळगाव क.प. जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मधुकर जगताप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Baramati Accident News: संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या राज्य मार्गावर अद्याप गतिरोधक बसवण्यात आलेले नसल्यामुळेच येथे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याच पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी जळगाव क.प. येथे रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Baramati Accident News: प्रशासानाच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

Baramati Accident News: जगताप कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

दरम्यान, अपघात घडवून पसार झालेल्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेल्या मधुकर जगताप यांच्या आकस्मिक निधनामुळे भिलारवाडी आणि मेडद परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Porsche Accident : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर

Mumbai Crime : 14 वर्षीय मुलाच्या अपहरणचा तब्बल तीन महिन्यानंतर छडा; मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून केली सुटका, कॅटरिंगच्या कामाला जुंपणाऱ्या दोघांना बेड्या

आणखी वाचा

Comments are closed.