तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली; रोहित पवारांचे बारामतीकरांना काळजाला भिडणारे आवाहन

Baramati By Election 2026: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला (Baramati By Election 2026) बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांना दूरध्वनीद्वारे पाठिंब्याची विनंती केली होती. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. काँग्रेसने रविवारी दिल्लीतून बारामती पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. आज सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे हे दोघेही आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेली एक ‘एक्स’ पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करतानाच मतदारांना साद घातली आहे.

Rohit Pawar on Baramati By Election 2026: नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो. तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Baramati By Election 2026: बिनविरोधचे प्रयत्न ठरले फोल

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते. स्वतः सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंब्याची विनंती केली होती. मात्र, काँग्रेसने रविवारी दिल्लीतून आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने बारामतीची पोटनिवडणूक आता लढली जाणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

Baramati By Election 2026: मैदानात 20 हून अधिक उमेदवार?

बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे आकाश मोरे हे आपले अर्ज सादर करतील. तसेच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे देखील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या 20 च्या वर जाण्याची चिन्हे आहेत.

आणखी वाचा

Baramati byelection 2026: सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन फिरवला, तरीही काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक उमेदवार दिलाच, माघार घेण्यासाठी ठेवली ‘ही’ अट

आणखी वाचा

Comments are closed.