“स्मिथचा बापही सिंगल घेतला असता…” बाबर आझमच्या बेइज्जतीवर माजी पाकिस्तानी दिग्गज भडकला
बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळणारा पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आजम सध्या स्टीव्ह स्मिथसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. सिडनी थंडर्सविरुद्धच्या सामन्यात स्मिथने बाबरला स्ट्राइक देण्यास नकार दिला, त्यामुळे बाबर चांगलाच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. ही घटना सामन्याच्या 11व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर घडली. बाबर सिंगल घेण्याच्या तयारीत होता, मात्र स्मिथने स्पष्ट नकार दिला आणि स्वतः स्ट्राइक ठेवली.
या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी बाबर आजमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यूट्यूबवर कामरान अकमलसोबत झालेल्या चर्चेत बासित अली म्हणाले की, स्मिथचे वर्तन चुकीचे असले तरी बाबरची स्वतःची प्रतिमा याला जबाबदार आहे. “असं घडायला नको होतं. स्मिथ वेगवान शतकाच्या मार्गावर होता, पण त्याने बाबरला आधीच सांगायला हवं होतं की सिंगल घेऊ नकोस. हे अपमानास्पद आहे,” असे बासित यांनी सांगितले.
यावर कामरान अकमल यांनी प्रतिक्रिया देताना, “जर सिक्सर्स बाबरवर समाधानी नसतील, तर त्याला ड्रॉप करा, पण अशा प्रकारे अपमान करू नका,” असे मत व्यक्त केले. मात्र बासित अली यांनी थेट बाबरच्या प्रतिमेवर बोट ठेवत म्हटले, “जर बाबरच्या जागी विराट कोहली असता, तर स्टीव स्मिथ कधीच असं वागला नसता.”
बासित पुढे म्हणाले, “स्मिथने पुढच्याच षटकात स्वतःला सिद्ध केलं. एक वेळ अशी आली की तो सहा षटकार मारेल असं वाटलं. विराट कोहली सिंगल घ्यायला गेला असता, तर स्मिथचा बापही सिंगल घेतला असता. तू स्वतःची किंमत कमी केली आहेस.”
यानंतर 12व्या षटकात सिक्सर्सने पॉवर सर्ज घेतला आणि स्मिथने एका षटकात विक्रमी 32 धावा केल्या, जे बीबीएल इतिहासातील सर्वाधिक आहेत. पुढच्या षटकात बाबरला स्ट्राइक मिळाली, मात्र तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. रागाच्या भरात बाबर मैदान सोडताना बाउंड्री कुशनवर बॅट मारताना दिसला.
स्मिथने 42 चेंडूत 100 धावांची शानदार खेळी केली आणि सिडनी सिक्सर्सने 190 धावांचे लक्ष्य 19 षटकांआधीच पूर्ण केले. दरम्यान, बाबर आजमची ही अडचण केवळ बीबीएलपुरती मर्यादित नसून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचा टी-२० स्ट्राइक रेट सातत्याने घसरत आहे. चालू बीबीएल हंगामात बाबरने केवळ 201 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट 107.48 इतका आहे.
Comments are closed.