जमिनीवरची शिवसेना कधीच संपलेली नाही, उद्धव ठाकरे यांनी भरला हुंकार
आपला महापौर व्हावा हे स्वप्न तर आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही नक्की घडेल, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच काहींना असे वाटत असेल की शिवसेना त्यांनी कागदावर संपवली आहे. पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपलेली नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विजयी उमेदवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सर्व विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “कदाचित काहींना असे वाटत असेल की शिवसेना त्यांनी कागदावर संपवली आहे. पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपलेली नाही.काहीही असो, शिवसेना जमिनीवर जिवंत आहे. सर्व प्रकारचे प्रयोग झाले, गद्दारी झाली, पण निष्ठा कोणीही विकत घेऊ शकला नाही. त्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो.”
ते पुढे म्हणाले की, “आज आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे. मी सर्वांची प्रथम दिलगिरी व्यक्त करतो, कारण आताच मी नगरसेवकांशी संवाद साधला आणि त्यांनाही हेच सांगितले की आता आपली खरी जबाबदारी वाढली आहे. आपला महापौर व्हावा हे स्वप्न तर आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही नक्की घडेल.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “मिंधे गटाचा हा विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी मिळवण्यात आला आहे. हे जे पाप झाले आहे, त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस कधीच क्षमा करणार नाही. आज मला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही सर्वांनी निष्ठेने लढा दिला.”
ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे तन आणि मन आहे, तर त्यांच्या हातात फक्त धन आहे. आपल्याकडे असलेल्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना घाम फोडला आहे. ही जी शक्ती आज एकवटलेली आहे, ती एकजूट कायम ठेवा. जेणेकरून तुमच्या पुढील पिढ्यांनाही अभिमान वाटेल की माझे आई-वडील, दादा-ताई, भवितव्यासाठी पैशांची ऑफर असतानाही विकले गेले नाहीत. हा तुमचा अभिमानास्पद उल्लेख केला जाईल.”
शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले, “असेच सोबत राहा. लढाई संपलेली नाही, उलट लढाई आता सुरू झाली आहे. शेवटी जिद्द महत्त्वाची असते आणि जिद्द कोणीही विकत घेऊ शकत नाही. त्या जिद्दीच्या जोरावर आपण पुन्हा जिंकू. मला याची अजिबात चिंता नाही. सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. असेच एकत्र रहा” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Comments are closed.