बीसीसीआयच्या वर्चस्वामुळे पाकिस्तानी खेळाडू संतापला! बांगलादेश वादावरून आयसीसीवर साधला निशाणा

आयपीएलमधून मुस्तफिजुर रहमानला (Mustafijur Rehman) बाहेर काढल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतात येण्यास नकार दिला आहे. सुरक्षेचे कारण देत बीसीबीने त्यांचे सामने दुसऱ्या देशात हलवण्याची विनंती आयसीसीकडे (ICC) केली आहे. या वादात आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अजमलने उडी घेतली असून खळबळजनक विधान केले आहे.

रिपोर्ट्सनुसार, सईद अजमल म्हणाला की, जर आयसीसी जागतिक क्रिकेटच्या हितासाठी निष्पक्ष आणि तत्त्वनिष्ठ निर्णय घेऊ शकत नसेल, तर त्यांनी आपले कामकाज बंद केले पाहिजे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) सध्याच्या वर्चस्वापुढे आयसीसी हतबल असल्याचे अजमलने सुचवले आहे.
अजमल पुढे म्हणाला, जर आयसीसी भारतीय बोर्डावर आपले निर्णय लागू करू शकत नसेल, तर त्यांच्या अस्तित्वाला काहीच अर्थ उरत नाही. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देणे, हे आयसीसीच्या हतबलतेचे मोठे उदाहरण आहे.

भारत पाकिस्तानमध्ये न खेळण्यामागे कोणतेही तार्किक कारण नाही, पण आयसीसी गप्प आहे कारण आता तिथे भारतीयांचे वर्चस्व आहे. अजमलने असाही दावा केला की, कसोटी खेळणारे बहुतेक देश माझ्या या मताशी सहमत आहेत, पण ते जाहीरपणे आपली भूमिका मांडू शकत नाहीत. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करत नाही. भारत सरकारही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिकेला (Bilateral Series) परवानगी देत नाही. हे दोन्ही देश आता फक्त आयसीसी किंवा आशिया चषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह हे आहेत.

Comments are closed.