खेळाडूंच्या तीव्र विरोधामुळे BCB चा मोठा निर्णय, नजमुल इस्लाम यांना पदावरून हटवले

बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) अखेर खेळाडूंसमोर झुकावे लागले आहे. बोर्डाचे संचालक एम. नजमुल इस्लाम यांनी आपल्याच संघातील खेळाडूंविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते, ज्यानंतर खेळाडूंनी बहिष्काराची (Boycott) धमकी दिली होती. सर्व बांगलादेशी खेळाडूंनी पत्रकार परिषद घेऊन बोर्डाला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. यावर आता बोर्डाने मोठी कारवाई करत संचालक एम. नजमुल इस्लाम यांना पदावरून हटवले आहे.

बीसीबी संचालक एम. नजमुल इस्लाम यांच्या वादग्रस्त विधानामुळे दुखावलेल्या खेळाडूंनी ‘बांगलादेश प्रीमियर लीग’वरच (BPL) बहिष्कार टाकला होता. यामुळे त्रस्त होऊन बोर्डाने आता मोठे पाऊल उचलले आहे. प्रसिद्धीपत्रकात बोर्डाने म्हटले आहे की, ‘बांगलादेश क्रिकेट बोर्ड हे स्पष्ट करू इच्छिते की, अलीकडील घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर आणि संघटनेच्या हितासाठी, बीसीबी अध्यक्षांनी मिस्टर नजमुल इस्लाम यांना वित्त समितीच्या (Finance Committee) अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून तात्काळ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बीसीबी घटनेच्या कलम 31 अंतर्गत अध्यक्षांना मिळालेल्या अधिकारांनुसार घेण्यात आला असून, बोर्डाचे कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे सुरू राहावे, हा यामागचा उद्देश आहे.’

यासोबतच, नवीन अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत हे अधिकार कोणाकडे असतील, हेदेखील प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. बोर्डाने लिहिले आहे की, ‘पुढील सूचनेपर्यंत, बीसीबी अध्यक्ष स्वतः वित्त समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. बीसीबी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की, क्रिकेटपटूंचे हित ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बोर्ड आपल्या अधिकारक्षेत्रातील सर्व खेळाडूंचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. या संदर्भात, बीसीबीला आशा आहे की, खेळासाठी असलेल्या या कठीण काळात सर्व क्रिकेटपटू बांगलादेश क्रिकेटच्या कल्याणासाठी व्यावसायिकता (Professionalism) आणि समर्पणाचा सर्वोच्च आदर्श दाखवतील आणि बीपीएलमध्ये आपला सहभाग सुरू ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील.’

Comments are closed.