गंभीरच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह, कसोटी संघासाठी ‘या’ दिग्गजाला BCCI कडून प्रशिक्षकपदाची ऑफर
गौतम गंभीर रेड-बॉल मुख्य प्रशिक्षक बातम्या : वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये भारताचे प्रशिक्षक म्हणून आयसीसी व एसीसी ट्रॉफी जिंकलेल्या गौतम गंभीरचा विक्रम नक्कीच प्रभावी आहे. मात्र कसोटी क्रिकेटच्या बाबतीत चित्र तसे काही आशादायी नाही. अव्वल संघांविरुद्ध दहा कसोटी सामन्यांतील पराभवानंतर गंभीरच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका गमावल्यानंतर क्रिकेट बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अनौपचारिकरीत्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधून, तो कसोटी संघाचे प्रशिक्षक बनण्यास इच्छुक आहेत का, अशी विचारणा केल्याचे समजते. मात्र लक्ष्मण सध्या बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये क्रिकेट प्रमुख म्हणूनच काम करत राहण्यात समाधानी आहेत.
गंभीरचा बीसीसीआयसोबतचा करार 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत असला, तरी त्यावर पुनर्विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाच आठवड्यांनंतर सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकातील भारताच्या कामगिरीवर बरंच काही अवलंबून असेल. बीसीसीआयच्या वर्तुळात अजूनही संभ्रम आहे की जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 सत्रातील उर्वरित नऊ कसोटी सामन्यांसाठी गंभीरलाच प्रशिक्षक म्हणून कायम ठेवावे की नाही.
कसोटी संघातून गंभीरची सुटका?
भारताला ऑगस्ट 2026 मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत, तर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडचा दौरा आहे. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलिया पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार, “गंभीरला बोर्डातील काहींचा पूर्ण पाठिंबा आहे. भारतीय संघाने टी20 विश्वचषक जिंकला किंवा किमान अंतिम फेरीत पोहोचला, तर गंभीर पदावर कायम राहतील. मात्र कसोटी स्वरूपात ते प्रशिक्षक म्हणून पुढे राहतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्यांना एक फायदा असा आहे की कसोटी क्रिकेटसाठी प्रशिक्षक म्हणून फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. व्हीव्हीएस लक्ष्मण यांना ही जबाबदारी घ्यायची इच्छा नाही.”
खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना
गंभीरच्या कार्यकाळात भारतीय ड्रेसिंग रूममधील अनेक खेळाडूंना राहुल द्रविड यांच्या काळासारखी सुरक्षिततेची भावना राहिलेली नाही. द्रविड यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येक खेळाडूची भूमिका स्पष्ट होती आणि स्वतःची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ दिला जात होता.
गिलला वगळल्याने वाढली भीती
टी20 विश्वचषक संघातून शुभमन गिलला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर गंभीरची छाप होती, असे मानले जाते. अनेक खेळाडूंचे मत आहे की भारतीय क्रिकेटचा पुढचा ‘पोस्टर बॉय’ समजला जाणारा खेळाडू जर अशा प्रकारे संघाबाहेर जाऊ शकतो, तर उद्या कोणाचाही नंबर लागू शकतो. टी20 विश्वचषकानंतर दोन महिने इंडियन प्रीमियर लीगचे सामने असतील आणि त्यानंतर बीसीसीआयकडे वेगवेगळ्या स्वरूपांसाठी वेगळे प्रशिक्षक ठेवायचे की तिन्ही स्वरूपांसाठी एकच प्रशिक्षक ठेवायचा, याचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ असेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.