आयपीएल 2026 ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या निधनावर बीसीसीआयची प्रतिक्रिया; कठीण काळात घेतला मोठा निर्णय
आयपीएल २०२६ दरम्यान ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विल्यम्स लँगफोर्ड यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ३० मार्च रोजी त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत सापडला होता. आयपीएल सामन्यांच्या कव्हरेजसाठी ते २४ मार्चपासून ट्रायडेंट हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. ते ब्रिटिश नागरिक होते आणि आयपीएल २०२६ साठी काम करत होते. मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे, मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. या कठीण काळात आता बीसीसीआयकडून (BCCI) पहिले अधिकृत विधान समोर आले आहे. या प्रकरणाबाबत बोर्डाने काय म्हटले आहे, ते जाणून घेऊया.
बीसीसीआयने या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, “आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि सर्व स्टेकहोल्डर्स इंजिनिअर इयान विल्यम्स लँगफोर्ड यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतात. आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत आहेत. आयपीएल या अत्यंत कठीण काळात लँगफोर्ड यांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत आणि पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या दु:खद प्रसंगी लँगफोर्ड यांच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यास आयपीएल तयार आहे.”
२९ मार्च रोजी मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यानंतर विल्यम्स लँगफोर्ड आपल्या खोलीत (खोली क्रमांक २७१५) गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल स्टाफने त्यांना फोन केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर कर्मचारी त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळ पोहोचले आणि मास्टर की वापरून दरवाजा उघडला. लँगफोर्ड यांचा मृतदेह खोलीच्या जमिनीवर पडलेला होता. तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास केला होता, मात्र आतापर्यंत काहीही संशयास्पद हाती लागलेले नाही.
Comments are closed.