बीसीसीआयचा 'हा' इशारा पाकिस्तान कधीच विसरणार नाही, ‘हँडशेक' प्रकरणावरती दिले कठोर उत्तर

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे सचिव देवजीत सैकिया यांनी भारत-पाकिस्तान सामन्यानंतर झालेल्या ‘हँडशेक वादावर’ मौन सोडले आहे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की वादावर नाही तर भारताच्या विजयाच्या जल्लोषावर सर्वांचे लक्ष केंद्रीत व्हायला हवे. हा वाद तेव्हा निर्माण झाला, जेव्हा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन केले नव्हते.

न्यूज एजन्सी आयएएनएसशी बोलताना देवजीत सैकिया म्हणाले, “मी फक्त एवढंच सांगू शकतो की भारताने शानदार विजय मिळवला आहे. ही टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी होती. आपल्याला कुठल्याही तिसऱ्या पक्षाने किंवा शत्रूराष्ट्राने पसरवलेल्या वादाकडे लक्ष न देता संघाच्या विजयाचा आनंद साजरा करायला हवा. आपल्याला याचा काही फरक पडत नाही. आपल्याला आपल्या खेळाडूंच्या उत्तम कामगिरीचा अभिमान वाटायला हवा. आम्हाला विश्वास आहे की टीम इंडिया स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत विजयाची ही लय कायम ठेवेल.”

14 सप्टेंबरला भारतीय संघाने प्रथम पाकिस्तानला केवळ 127 धावांवर रोखले आणि नंतर 7 गडी राखून सोपा विजय मिळवला. सामन्यापूर्वी टॉसच्या वेळी दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलनही केले नव्हते. यावर पीसीबीने सामना रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. असा आरोप करण्यात आला होता की त्यांनी सलमान आगाला भारतीय कर्णधाराशी हस्तांदोलन करू नकोस, असे सांगितले होते. मात्र आयसीसीने ही अपील फेटाळून लावली आहे.

तर सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले. इतकेच नाही तर टीमने ड्रेसिंग रूमचे दरवाजेही बंद केले होते. भारतीय संघातील एकही खेळाडू पाक संघाशी हस्तांदोलन करण्यासाठी बाहेर आला नव्हता.

जेव्हा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांना या घटनेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की, “भारत सरकार आणि बीसीसीआय या प्रकरणात एकमत आहेत. आम्ही हा निर्णय घेतला होता आणि आम्ही इथे फक्त सामना खेळण्यासाठी आलो होतो.”

Comments are closed.