काही लोक ‘चाव्या’ मारत होते तेव्हा आम्ही चावी वाटपास भाग पाडले, बीडीडी प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा टोला
वरळी येथे बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत महत्त्वाचे विधान केले. बीडीडी हा आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगत त्यांनी या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी पुर्नविकासाला सुरुवात झाली. अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू होते, असेही त्यांनी सांगितले. सध्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्याच परिसरात उभे राहून पूर्वी आंदोलन केले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
नायगाव येथील बीडीडी चाळींच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, आंदोलनानंतरच सरकारला चावी वाटप करावे लागले. दोन-तीन महिने काम पूर्ण होऊनही रहिवाशांना चाव्या देण्यात येत नव्हत्या. काही लोक चाव्या मारत होते पण आम्ही केलेल्या आंदोलनामुळे सरकारला चावी वाटप करण्यास भाग पाडले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
बीडीडी पुनर्विकासाचे काम टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकल्पातील विलंबाबाबत प्रश्न सध्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही हा प्रकल्प पूर्ण करू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
Comments are closed.