घंटा वाजताच, मधमाशांचे डोके उठले; हल्ल्यात 42 ग्रामस्थ जखमी

रायगड जिल्ह्यातील म्हसळा गावातील गावदेवीच्या मंदिरात आरती करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना म्हसळा तालुक्यातील कोळवट येथे आज घडली. आरतीची सुरुवात करताच एका ग्रामस्थाने मंदिराची घंटा वाजवली अन् यामध्ये मधमाशांचे डोके उठले. त्यानंतर मधमाशांनी थेट ग्रामस्थांवर हल्ला केला. या घटनेत 42 ग्रामस्थ जखमी असून 13 बालकांचा समावेश आहे.

म्हसळा तालुक्यातील कोळवट गावात
ग्रामदेवतेचे मंदिर आहे. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गावातील सर्व ग्रामस्थ गावदेवीच्या मंदिरात आरती करण्यासाठी गेले होते. आरती सुरू झाल्यानंतर मधमाशांनी थेट ग्रामस्थांवर हल्ला केला. काही कळायच्या आत आरती सोडून ग्रामस्थांनी पळ काढला. या हल्ल्यात एकूण 42 जण जखमी झाले असून त्यामध्ये 13 बालकांचा समावेश आहे. यापैकी दोघांना अधिक त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी त्यांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अन् जीव वाचला
मधमाशांनी हल्ला केल्याचे घटना कळताच गावातील नागरिकांनी मंदिराकडे धाव घेतली. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णवाहिका प्रशासनाने तत्परता दाखवल्याने ग्रामस्थांचा जीव वाचला.

Comments are closed.