बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! 32 गावांना पुराचा वेढा; गोदावरी, सिंदफणा, सरस्वती, मांजरा, कुंडलिका, बिंदुसरा नद्यांना महापूर

आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मारलेल्या जोरदार मुसंडीने बीड जिल्ह्यामध्ये हाहाकार उडाला आहे. बीड जिल्ह्यातील १८ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक नद्यांना महापूर आला आहे. गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील ३२ गावांना पुराचा फटका बसला आहे. राक्षसभुवने शनि मंदिर, पांचाळेश्वर, गंगामसल्याचे मोरेश्वर पाण्याखाली आहेत. माजलगाव धरणाचे १०, अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे २, मांजरा प्रकल्पाचे ४ दरवाजे सताड उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने जिल्हावासियांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासामध्ये पावसाने ४६.१ मि.मी.ची नोंद केली आहे. १८ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यंदाच्या पर्जन्यमानाची सरासरी ९५.२ पर्यंत पोहचली आहे. जायकवाडी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी पात्र भरून वाहत असताना बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी, मांजरा, सिंदफणा, सरस्वती, बिंदुसरा, कुंडलिका, वांजरा या नद्यांना पूर आला आहे. माजलगाव मध्यम प्रकल्पाचे १० वक्री दरवाजातून ०.८० मिटरने ३१ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मांजरा प्रकल्पाचे पाचव्यांदा दार उघडण्यात आले आहे. ४ दरवाजातून ४ हजार क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे २ दरवाजे २० सें.मी.ने उघडण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील तब्बल १०० लघू आणि मध्यम प्रकल्प भरलेले आहेत. अनेक प्रकल्पातून पाणी ओसंडून वाहत आहे. बीड जिल्हा पाणीमय झालेला आहे. गोदावरीला आलेल्या महापुरामुळे गेवराई तालुक्यातील १२ आणि माजलगाव तालुक्यातील २० गावांना पुराचा फटका बसला आहे. राक्षसभुवनचे शनि मंदिर पाण्याखाली आहे. पांचाळेश्वर मंदिरही पाण्यामध्ये बुडाले आहे. गेवराई तालुक्यातील राजापूरला पावसाने वेढा दिला आहे. माजलगाव तालुक्यातही पूर परिस्थिती विदारक आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या शेतामध्ये आणि गावामध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.अमृत नदी तुडंब भरून वाहत असल्याने गोदावरी पट्ट्यातील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे. सरस्वती नदीच्या पाण्यामुळे कोथळा गावात पणी शिरले. माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी गावाला पाण्याचा वेढा बसला आहे.

जिल्ह्यातील या १८ महसूल मंडळात झालेली अतिवृष्टी
बीड तालुका- राजुरी ७७.३ मि.मी., नाळवंडी ७४.३ मि.मी., चर्‍हाटा ७७.३ मि.मी., पारगाव सिरस ७७.३ मि.मी.,
पाटोदा तालुका – पाटोदा ६७.८ मि.मी., थेरला ८६.८ मि.मी.
गेवराई तालुका- धोंडराई १९८ मि.मी., उमापूर १३९ मि.मी., रेवकी १४३ मि.मी., तलवाडा ९४ मि.मी., गेवराई ८८ मि.मी., चकलांबा १३१.८ मि.मी.,
पारली तालुका- पिंपलगाव मी.
शिरूरकासार- शिरूर ९१.५, रायमोहा १२१.८ मि.मी., ब्रम्हनाथ येळंब १०९ मि.मी., तिंतरवणी १००.८ मि.मी., खालापुरी ९६.५ मि.मी.

Comments are closed.