लग्न जमवून देण्याचा बहाणा, बीडमध्ये शेतमजुराला लुटलं, लुटारू टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

बीड गुन्हा: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची तब्बल 1 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वडवणी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दीड महिन्यात पोलिसांची ही दुसरी कारवाई असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बनावट लग्नाचा कट

वडवणी तालुक्यातील ज्ञानेश्वर रोमन हा तरुण मजुरी करून उदरनिर्वाह करतो. विवाहासाठी त्याने ओळखीतील महादेव घाटे या व्यक्तीकडे योग्य मुलगी पाहण्याची विनंती केली. महादेवने त्याच्या संपर्कातून जालना जिल्ह्यातील एका मुलीला व तिच्या आईला ज्ञानेश्वरच्या घरी बोलावले. दोघांची ओळख करून देत हा विवाह ठरल्याचे सांगण्यात आले. यावेळी महादेवसह इतर दोन जणांनी ज्ञानेश्वरकडून पैशांची मागणी केली. सुरुवातीला दोन लाख रुपये मागण्यात आले, मात्र तडजोडीनंतर १ लाख 70 हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे 10 ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वरचा बनावट विवाह करून देण्यात आला.

आठवड्याभरात उघडकीस आला प्रकार

लग्नानंतर आठवडाभरातच मुलीच्या घरच्यांनी तीला घेण्यासाठी येण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने ज्ञानेश्वरला काहीतरी चुकीचे असल्याची जाणीव झाली. त्याने तातडीने वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.तपासादरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली.

न्यायालयीन कारवाई आणि पुढील तपास

अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात ही टोळी संघटित असल्याचा संशय असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, याच टोळीने अन्य तरुणांचीही फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोणाचीही अशी फसवणूक झाली असल्यास वडवणी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.